मुख्यमंत्र्यांच्या 'अल्लाह हाफिज' व्हिडिओपासून ते मुंबईचा महापौर मराठीच होणारपर्यंत...युतीच्या घोषणेवेळी नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. तर, मुंबईला महाराष्ट्रापासून किंवा महाराष्ट्राला मुंबईपासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेन त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या 'अल्लाह हाफिज' व्हिडिओपासून ते मुंबईचा महापौर मराठीच होणारपर्यंत...युतीच्या घोषणेवेळी नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
मुख्यमंत्र्यांच्या 'अल्लाह हाफिज' व्हिडिओपासून ते मुंबईचा महापौर मराठीच होणारपर्यंत...युतीच्या घोषणेवेळी नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
Published on

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात आज (दि.२४) मोठी घडामोड घडली आणि अखेर राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली. मुंबईच्या वरळी येथील ब्लू सी हॉटेलमध्ये उद्धव आणि राज दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. तर, मुंबईला महाराष्ट्रापासून किंवा महाराष्ट्राला मुंबईपासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेन त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक - संजय राऊत

"संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जो संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश महाराष्ट्रामध्ये आला तो मराठी ऐक्याचा मंगलकलश होता आणि आज पुन्हा एकदा हा मराठी ऐक्याचा मंगलकलश घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्यासमोर आलेले आहेत, तोच आनंदाचा क्षण आज महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे. मी अजिबात यापुढे काहीही बोलणार नाही, हाच मंगलकलश मुंबईसह अनेक महानगरपालिकांमध्ये विजयी भगवा ध्वज फडकावल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राला फक्त ठाकरेच नेतृत्त्व देऊ शकतात आणि महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाईल हे सांगणारी आजची पत्रकार परिषद आणि आजचा दिवस आहे" असे म्हणत संजय राऊत यांनी माईक उद्धव ठाकरेंकडे सोपवला.

अन् शिवसेनेचा जन्म झाला

"संजय राऊत यांनी आता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. तो जो मंगलकलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला नाही. त्याच्यामागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे. १०५, १०७ किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला जिंकून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे. कारण आम्ही आज दोघं इथे बसलेलो आहोत...ठाकरे बंधू...आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या ५ सेनापतींपैकी एक सेनापती...त्यांच्यासोबत माझे वडील म्हणजेच शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होतं. त्याच्यानंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही...पण, मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचायला लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कांसाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला.

...त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही

पुढच्या वर्षी शिवसेनेला ६० वर्षे होतील. इतकी वर्षे व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहत आहोत की, मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती, त्यांचेच दोन प्रतिनिधी वरती म्हणजे दिल्लीत बसलेले आहेत त्यांचे मनसुबे आहेत...आणि आता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काही संघर्ष, ते जे काही हुतात्मा स्मारक आहे, त्याचा मोठा अपमान होईल. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत आणि मी मागेच म्हटलं, एकत्र आले आहोत, ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कुणीही वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने मुंबईला महाराष्ट्रापासून किंवा महाराष्ट्राला मुंबईपासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेन त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत.

तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका

उत्साह अमाप आहे. मला कल्पना आहे की आज केवळ महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश बघतोय. मी सर्वांना विनंती करतोय, आवाहन करतोय आणि एक सूचनासुद्धा करतोय, कारण मागे विधानसभेच्या वेळेला भाजपने जो अपप्रचार केला होता 'बटेंगे तो कटेंगे'...तसंच मी मराठी माणसांना सांगतोय, 'आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका... हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे. मला खात्री आहे की, मराठी माणूस सहसा कुणाच्या वाटेला जात नाही. पण त्याच्या वाटेला जर कुणी आलंच तर त्याला परत जाऊ देत नाही", असे अखेरीस म्हणत त्यांनी माईक राज ठाकरे यांच्याकडे सोपवला.

काय म्हणाले राज ठाकरे?

"जे काही बाकी बोलायचंय ते जेव्हा जाहीर सभा सुरू होतील तेव्हा बोलूच आम्ही. परंतु मागे माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामहून आठवण करून देतो त्या गोष्टींची...त्या मुलाखतीत मी असं म्हटलं होतं की, कुठल्याही वादापेक्षा व भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं की, तिथून त्या वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली, असे राज ठाकरे म्हणाले.

राजकीय पक्षांमधील मुलं पळवणाऱ्या दोन टोळ्यांची भर

पुढे बोलताना, कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला. कारण, महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुले पळवणाऱ्या खूप टोळ्या फिरतायेत. त्यात दोन टोळ्यांची अजून भर पडली आहेत..त्या राजकीय पक्षांमधील मुलं पळवतात, असे ते म्हणाले आणि एकच हशा पिकला. त्यानंतर, "जे निवडणुका लढवणार आहेत, त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची, केव्हा भरायची, ते आपल्याला कळवलं जाईल. आज फक्त आपल्यासमोर एकच गोष्ट मी सांगू इच्छितो की, बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना व मनसेची युती झाली हे आज आम्ही जाहीर करत आहोत", असे राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार, असे राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

"उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाहीत"

उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक असेल, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते, त्यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, 'त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते, त्यांना त्यांच्या पक्षातसुद्धा कोण विचारत नाही, त्यामुळे जाऊदे', असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर अचानक राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडून माईक घेतला आणि 'मला असं वाटतं की उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाहीत' असं मिश्किल उत्तर दिलं, त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मुख्यमंत्र्यांचा अल्लाह हाफिज म्हणणारा व्हिडिओ

तुम्हाला मत म्हणजे मुस्लिमधार्जिण राजकारणाला बळ देणे, असा आरोप होत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारताच, 'मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओही फिरतोय ज्यामध्ये ते अल्लाह हाफिज असे म्हणालेत. तर या गोष्टी त्यांनी सांगू नये...माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत'...व्हिडिओ लावणार का? असे विचारले असता 'ते काय बोलताय त्यावर माझे व्हिडिओ तयार असतील' असेही राज यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ठाकरे बंधूंची ही युती मुंबईसह नाशिक, कल्याण-डोबिंवली, पुणे, ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिकांसाठी असणार आहे, अशी माहिती यापूर्वीच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 

logo
marathi.freepressjournal.in