उजेडाकडून परत अंधाराकडेच

उजेडाकडून परत अंधाराकडेच
Published on

1 जून रोजी महाराष्ट्रातील सरकारी, निमसरकारी, सहकारी व खासगी उद्योगातील कैक माणसं एकाच वेळी सेवानिवृत्त झाली. कारण काय तर त्या सर्वांची जन्मतारीख १ जून अशीच होती. खरोखरच ते सर्वजण त्या दिवशी जन्मले होते काय, याचा विचार केल्यास त्याचे उत्तर नकारार्थी येते. भारताला अशिक्षितपणाचा शापच होता. आजही काही प्रमाणात तो आहेच. किंबहुना, बहुसंख्य अशिक्षित माणसांवर अल्पसंख्य शिकलेले खुलेआम वर्चस्व राखून होते. त्यांच्या जन्मतारखेचा पत्ता नव्हता व नाही. त्यांची जन्मतारीख नक्की नाही. मग पत्रिका अन‌् कुंडली तर लांबच. तरीही १ जून जन्मतारीख असलेले ढीगभर लोक त्यांच्या जीवनात यशस्वी झाले आहेत. पत्रिका न काढता, कुंडली न काढता व न पाहताही आयुष्यात यशस्वी होता येतं. याचा धडधडीत पुरावा म्हणजे अशी १ जून जन्मतारीख असलेली कर्तृत्ववान माणसं.

तारीख, वेळ, दिवस, वार, हे सर्व माणसाने मोजण्यासाठी केलेली एकक आहेत. जसं किलो, मीटर, फूट ही जशी एकक, अगदी तसंच हीपण एकक, ही साधी, सोपी गोष्ट समजून घेतली पाहिजे. यश कुंडली, पत्रिका, जन्मवेळ, रास या गोष्टींवर अवलंबून नसतं. तर यश माणसाच्या कर्तृत्वावर व कर्मावर ठरतं, हे मान्य करायला हरकत नाही. पिढ्यान‌् ‌‌पिढ्या शिक्षणापासून अलिप्त ठेवलेल्या समाजाला शिक्षणाची दारे समाजसुधारकांनी उघडली. गावोगावी शाळा काढल्या. अशा शाळेत जाणारी अडाणी आईबापाची लेकरं. शाळेत घालताना मुलाची जन्मतारीख विचारली, तर हा जन्मला तवा संक्रांत चार दिवसांवर होती, दिवाळी तोंडावर होती, शिमगा नुकताच झाला होता, तवाच्या साली दुष्काळ पडलाता बघा, अशी उत्तरे मिळत. स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजनेत सरकारने शिक्षणाला प्राधान्य दिले होते. गावोगावी अन‌् अगदी वाड्यावस्त्यांवर शाळा सुरू झाल्या. त्यामुळे बहुजन समाज मोठ्या प्रमाणात शिकला. शाळेत दाखल करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना सहा वर्षे मागे जाऊन १ जून तारीख नमूद करावी, असे शासनाने आदेश दिले होते. त्यामुळे गुरुजींनीच शाळेसाठी म्हणून १ जून अशी जन्मतारीख नमूद केली होती व आहे. त्याप्रमाणे जन्मतारखेच्या नोंदी केल्या गेल्या.

रीतसर शिक्षण घेणारी ही पहिली पिढी आपल्या कर्तृत्ववाने यशस्वी झाली. नेटाने संसार केला. आपल्या पोरांना इंजिनीअरिंग, मेडिकल असं उच्चशिक्षण दिलं. १ जून जन्मतारीख असणारे ती तारीख सांगायला संकोच बाळगतात, लाजतात. आपले आईबाप अडाणी होते, हे सांगण्याची बऱ्याच जणांना लाज वाटते. काहीजण टिंगलटवाळीही करतात. खरं तर ज्यांची जन्मवेळ माहीत नाही, त्यांची कुंडली नाही. त्यांची जन्मपत्रिका नाही. त्यांना रास नाही. जन्मवेळ शुभ की अशुभ, याचा पत्ता नाही. त्यामुळे ते आयुष्यभर कोणत्याही कर्मकांड, उपासतापास, व्रत वैकल्य अशा भानगडीत पडले नाहीत. खऱ्या अर्थाने ते विज्ञानवादी व विवेकी जीवन जगले. त्यातले कैकजण मोठे झाले. उच्चपदस्थ अधिकारी झाले. आमदार, खासदार, मंत्री झाले. त्यांना त्यांच्या कुंडली अगर पत्रिका याची कुठंच अडचण आली नाही; परंतु आज त्यांच्यापैकी बरेच जण स्वतःच्या मुलाबाळांच्या कुंडल्या अन‌् पत्रिका काढायला लागले.

यांची पुढची उच्चशिक्षित पिढी पत्रिका, कुंडली, मुहूर्त यात अडकली. स्त्रियांचंही असंच काहीसं झालं. चूल-मूल यात अडकलेली स्त्री शिकण्यासाठी समाजसुधारकांनी खस्ता खाल्या. सनातनी धर्माचा रोष सहन केला. सावित्रीबाईनी शेणागोळ्याचा मारा सहन केला. ती स्त्री शिकली, उपास तापास, व्रतवैकल्य, पूजा-अर्चा यात अडकली. गुरुवारी शामबालेची कथा वाचत बसली. पूर्वी म्हणजे कित्येक वर्षांपूर्वी अस्तित्वात नसलेल्या; पण आता देव झालेल्या बाबा, बापू, साध्वी, महाराज यांच्या बैठकीला जाऊ लागली. पोथ्या पुराण वाचू लागली. यापैकी बरेच जण सत्यनारायण घालू लागले. शुभ-अशुभ दिवस बघू लागले. त्यांचे मुहूर्ताशिवाय पान हलेना. शिक्षण आणि ग्रंथालय यांची या पिढीला नुकतीच ओळख झाली होती. त्याची वाट सोडून हे परत देवा धर्माच्या नादी लागले. वाचनालय ते देवालय असा त्यांचा उलटा प्रवास सुरू झाला. विज्ञान व विवेक यांच्यापासून ते दूर चाललेत. अंधश्रद्धा, कर्मकांड याकडे त्यांचा कल वाढत चालला. समाजात आलेल्या या नव्या कुंडलीपत्रिका, मुहूर्त, कर्मकांड, सत्यनारायण, बुवा, बाबा, बापू, महाराज या गोष्टीच्या ते आहारी चाललेत. तसं करण्याआधी आपल्या बापजाद्यानी या गोष्टी केल्या होत्या काय? त्यांचं काय अडलं होत का? याचा साधा सरळ विचार त्यांनी केला नाही.

या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. त्यातील विवेकी उत्तर स्वीकारले पाहिजे. नाहीतर या शिकलेल्या तिसऱ्या चौथ्या पिढीपेक्षा पहिल्या पिढीला शाळेत घालणारी व लौकिक अर्थानी अडाणी असणारी पिढीच खरी बुद्धिमान पिढी म्हणावी लागेल. बाकी या पिढीने घोकंपट्टी करून डिग्री घेतल्या; पण बुद्धीचा वापर केला का? याची चिकित्सा करावी लागेल. न शिकलेल्या, अशिक्षित, अडाणी आईबापा पोटी जन्मूनही त्यानी तुम्हाला प्रकाश दाखवला. तुम्ही मात्र त्या उजेडातून तुमची पुढची पिढी अंधारात ढकलून देत आहात. याची जरा तरी आपल्याला लाज वाटू द्या. अंधारातून प्रकाशाकडे आपला झालेला प्रवास नेमक्या उलट्या दिशेने सुरू आहे. आपण उजेडाकडून अंधाराकडे चाललो आहोत. ते थांबवा.

logo
marathi.freepressjournal.in