मराठी पाट्या न लावणाऱ्यांविरोधात गुरुवारपासून कारवाईचा बडगा

मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने, आस्थापना असून त्यापैकी ५० टक्केच दुकानांनी मराठी पाट्यांचा नियम अमलात आणला आहे
मराठी पाट्या न लावणाऱ्यांविरोधात गुरुवारपासून कारवाईचा बडगा

मराठी पाट्या लावण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपल्याने दसऱ्यानंतर कारवाईसाठी मुंबई महापालिकेचा दुकान व अस्थापने विभागातील अधिकारी सज्ज झाले आहेत. ७५ अधिकाऱ्यांची टीम गुरुवारपासून कारवाईचा बडगा उगारणार असल्याची माहिती पालिकेच्या दुकान व अस्थापने विभागातील अधिकाऱ्याने दिली.

मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने, आस्थापना असून त्यापैकी ५० टक्केच दुकानांनी मराठी पाट्यांचा नियम अमलात आणला आहे. मात्र, आता उर्वरित सुमारे दोन ते अडीच लाख दुकानांवर गुरुवारपासून कारवाई करण्याची तयारी पालिकेने केली आहे. यापूर्वी २०१८च्या निर्णयानुसार १० किंवा दहापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक होते. पण, नव्या नियमानुसार कर्मचार्‍यांची संख्या विचारात न घेता मराठी भाषेतच फलक असणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनास कलम सातनुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे.

मात्र, मुदत वाढ देऊनही अनेक दुकानांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पालिकेचे पथक मुंबईभर दुकानांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करणार आहे. त्यासाठी पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या ७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा चमू तयार केला आहे. मुंबई पालिकेच्या सर्व २४ विभागात होणाऱ्या कारवाईत दुकानांवर मराठी पाटी न आढळल्यास दंड आकारला जाईल. त्यावेळी, दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in