बुधवारपासून मुंबई तापणार...; मुंबईसह ठाणे परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना

उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईसह ठाणे परिसरातील तापमानात हळूहळू वाढ होत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबई, ठाणे परिसरातील गारवा कमी झाला असून उकाडा जाणवत आहे.
बुधवारपासून मुंबई तापणार...; मुंबईसह ठाणे परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना
Published on

गिरीश चित्रे/मुंबई

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना बुधवारपासून मुंबईसह ठाणे परिसरातील पारा ३७ ते ३८ अंश सेल्सिअस इतका चढा राहणार असल्याचा अंदाज कुलाबा हवामान खात्याने वर्तवला आहे.

उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईसह ठाणे परिसरातील तापमानात हळूहळू वाढ होत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबई, ठाणे परिसरातील गारवा कमी झाला असून उकाडा जाणवत आहे. या आठवड्यात बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवारी मुंबई उपनगरासह ठाणे परिसरात तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस असेल. त्यामुळे दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबईकरांसह ठाणेकरांना कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी केले आहे.

दरम्यान, पुढील तीन महिने उन्हाळ्याचे असून उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना त्रास होऊ नये यासाठी राणी बागेतील पशु-पक्ष्यांना कलिंगड, काकडी, केळी, केक, आइस फ्रूट, उसाचा गारेगार रस अशी मेजवानी सुरू करण्यात आली आहे. गरमी जाणवू लागल्याने राणी बागेतील पशु-पक्षी सावलीचा आडोसा, पाण्यात डुबकी मारत गरमीपासून बचाव करत असल्याचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या डॉ. कोमल राऊत यांनी सांगितले. मार्च महिन्यापासून मुंबईच्या तापमानात वाढ होत असून दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर पडताच उन्हाचे चटके बसू लागतात. दुपारच्या उन्हात बाहेर पडताना पुरुषवर्ग डोक्यावर टोपी, तर महिला ओढणी घेत उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करत आहेत.

तलावात डुबकी मारून प्राणी अनुभवताहेत गारवा

हत्तीणीला उकाड्यापासून संरक्षण मिळण्यासाठी दररोज सकाळी थंड पाण्याची आंघोळ घालण्यात येत आहे. उकाडा वाढल्यास हत्तीण या ठिकाणच्या छोट्या तलावात वारंवार डुबकी मारते. शिवाय बिबट्या, वाघ, तरस, पाणगेंडा, अस्वल आदींसाठी निवासाजवळ छोटे तलाव बनवण्यात आले आहेत. उकाडा वाढल्यास हे प्राणी या तलावात बसून गारवा अनुभवत आहेत.

राणी बागेतील पशु-पक्ष्यांना थंडगार मेजवानी सुरू

वाढत्या उकाड्यामुळे राणी बागेतील पशु-पक्ष्यांसाठी विशेष व्यवस्थेसह विशेष आहार उपलब्ध करण्यात आला आहे. या ठिकाणी ५० हरणे, २० ते २५ माकडे, हत्तीण, अस्वल, दोन बिबटे, दोन वाघ, दोन तरस, चार कोल्हे आणि शेकडो प्रकारचे पशु-पक्षी आहेत. वाढत्या उकाड्यात या सर्वांची विशेष काळजी घेतली जात आहे. प्राण्यांना ‘गारेगार मेजवानी’चा आस्वाद घेताना पाहून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचेही चांगलेच मनोरंजन होत आहे. या मेजवानीमध्ये प्राण्यांना कलिंगड, चिकू, पेरू, थंडगार ऊस, तर हत्ती-अस्वल आदींसाठी आइस फ्रूट, आइस केक, माकडांसाठी बर्फाचा गोळा, काकडी, मोसंबी, जांभळं, फणस, हिरव्या भाज्या उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे डॉ. राऊळ यांनी सांगितले.

तीन दिवस उन्हाच्या झळा

उत्तरेकडील गरम वारे वाहू लागल्याने तापमानात वाढ होत आहे. बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवशी विशेषतः मुंबई उपनगरातील तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. तापमानवाढीमुळे मुंबई उपनगर, ठाणे परिसरात उन्हाच्या झळा जाणवणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in