

मुंबई : ग्राहकांचे आरोग्य आणि सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता देशभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी, मिठाईची दुकाने आणि सर्व खाद्य व्यावसायिकांना खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी स्टेपल पिन, मेटल वायर किंवा अशाच प्रकारच्या धातूच्या वस्तूंचा वापर करण्यास तत्काळ बंदी घालण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक ठिकाणी केक, मिठाईचे बॉक्स, स्नॅक्स पॅकेट्स आणि टेक-अवे फूड पार्सल्समध्ये स्टेपल पिन किंवा मेटल वायरचा वापर केला जात आहे. अनेक प्रकरणांमध्ये या धातूच्या वस्तू थेट अन्नामध्ये सापडल्या आहेत.
तसेच प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, या नव्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांवर 'अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६'अंतर्गत दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व खाद्य व्यावसायिकांनी लवकरात लवकर सुरक्षित आणि पर्यायी पॅकेजिंग पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
केवळ स्टेपल पिनच नव्हे, तर यापूर्वी प्राधिकरणाने खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी किंवा सर्व्ह करण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर टाळण्याचे निर्देश दिले होते. वृत्तपत्रांमधील शाई आणि त्यातील हानिकारक रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात, असे प्राधिकरणाने यापूर्वीच नमूद केले आहे.
खाद्य व्यवसायांसाठी बदल अपरिहार्य
ग्राहक सुरक्षा आणि अन्नाची गुणवत्ता राखण्यासाठी प्राधिकरण सातत्याने कडक धोरण अवलंबत आहे. या नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे आता खाद्य व्यवसायांना त्यांच्या पॅकेजिंग पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल करणे आता अपरिहार्य ठरणार आहे.
आरोग्याला धोका
जर चुकून या स्टेपल पिन किंवा मेटल वायर अन्नासोबत पोटात गेल्या, तर त्यामुळे तोंड, घसा आणि पचनसंस्थेला गंभीर इजा होऊ शकते. या गंभीर धोक्याचा विचार करून प्राधिकरणाने ही बंदी लागू केली आहे.