फरार बुकी सौरभ चंद्राकारची नाईट क्लबमध्ये गुंतवणूक

पोलिसांनी टीम इनोव्हेट एलएलपीच्या कार्यालय क्रिस्टल प्लाझा, शास्त्री नगर, अंधेरी येथे शुक्रवारी रात्री छापेमारी केली. तेथून डिजीटल उपकरणे जप्त केली.
फरार बुकी सौरभ चंद्राकारची नाईट क्लबमध्ये गुंतवणूक

मुंबई : महादेव ॲॅपच्या माध्यमातून क्रिकेट बेटिंग घेणारा फरार बुकी सौरभ चंद्राकार याने दुबई व लंडनच्या नाईट क्लबमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे उघड झाले आहे. मॅचफिक्सींगमधून मिळणारा नफा तो मुंबईतील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी टीम इनोव्हेशन एलएलपीत गुंतवत असल्याचे उघड झाले आहे.

टीम इनोव्हेशन व त्याचा प्रवर्तक सिद्धेश कुडतरकर व त्याची प्रेयसी स्नेहल शिर्के यांचे नाव मुंबई पोलिसांच्या एफआयआरमध्ये नोंदवले आहे. भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामन्यांची तिकिटे काळ्या बाजारात विकण्यासाठी तिकिटे उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या एफआयआरमध्ये त्यांचे नाव टाकण्यात आले आहे. तिकीटाच्या काळाबाजारप्रकरणी यापूर्वी आकाश कोठारी व रोशन गुरुबक्षानी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी टीम इनोव्हेट एलएलपीच्या कार्यालय क्रिस्टल प्लाझा, शास्त्री नगर, अंधेरी येथे शुक्रवारी रात्री छापेमारी केली. तेथून डिजीटल उपकरणे जप्त केली. पोलिसांनी सिद्धेश कुडतरकर व स्नेहल शिर्केला चौकशीसाठी बोलवले आहे. सिद्धेश सध्या इटलीत आहे.

महादेव ॲॅप घोटाळ्याचा तपास सध्या ‘ईडी’कडून सुरू आहे. या ॲॅपमार्फत क्रिकेट सामने, फुटबॉल, टेनिस व पोकर व तीन पत्ती यांच्यावर जुगार खेळला जात होता. सौरभ चंद्राकार हा दुबईत राहून हा व्यवसाय करत आहे. छत्तीसगडमध्ये चंद्राकार व त्याचा मित्र रवी उप्पल हे रस विकत होते.

सौरभ चंद्राकार याने मॅचफिक्सींग व क्रिकेट बेटिंगमधून मिळणारा नफा लंडनच्या प्राऊड लेट नाईट क्लब व व्हिक्टोरिया एम्बार्कमेंट व दुबईतील मँटीस डान्सेस व नाईट क्लबमध्ये गुंतवला. मुंबई पोलिसांनी सौरभ चंद्राकार याच्या महादेव ॲॅपविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यात ३२ बुकींचाही समावेश आहे.

भारत-न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्याची तिकीट विक्री ऑनलाईन प्लॅटफार्मवरून करण्यात आली. त्यातील काही तिकीटे काळ्याबाजारात फिरवण्यात आली. २५०० रुपयांचे तिकीट १ लाख रुपयांना विकण्यात आले. सौरभ चंद्राकार याने क्रिकेट बेटिंग व मॅच फिक्सींगवर नफा कमवायला सुरुवात केली. हा नफा त्याने मोहित बिजलानी व सिद्धेश कुडतरकर यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या टीम इनोव्हेशन एलएलपीमध्ये गुंतवला. ही कंपनी लंडन व दुबईत नाईटक्लब व बार चालवते.

सिद्धेश कुडतरकर सध्या इटलीच्या मिलानमध्ये आहे. तो तो तिथे बॅचरल पार्टी करत आहे. कुडतरकर व त्याची प्रेयसी स्नेहल शिर्के यांना जे. जे. मार्ग पोलिसांनी समन्स बजावले आहे. दोघांशीही संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

logo
marathi.freepressjournal.in