कुर्ला येथे फर्निचरच्या गाळ्यांना आग

काही क्षणातच ही आग पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कुर्ला येथे फर्निचरच्या गाळ्यांना आग
Published on

मुंबई : कुर्ला येथील लालबहादूर शास्त्री मार्गावरील फर्निचरच्या गाळ्यांना आग लागली. या दुर्घटनेत १५ ते १६ गाळे जळून खाक झाले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून, चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

कुर्ल्यातील लालबहादूर शास्त्री मार्गावर लाकडी फर्निचरचे गोदामे आहेत. दाटीवाटीने वसलेल्या कुर्ला गार्डन परिसरातील लाकडाच्या एका फर्निचरच्या गाळ्याला सोमवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. काही क्षणातच ही आग पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले; मात्र आग भडकत गेली आणि त्यात १५ ते १६ फर्निचरच्या गाळ्यांना झळ बसली.

या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आग कशामुळे लागली याची अधिक चौकशी अग्निशमन दल, पोलिसांकडून केली जात असल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर चार तासांत नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला; मात्र या आगीत लाकडी फर्निचरची १५ ते १६ गाळे जळून खाक झाले.

logo
marathi.freepressjournal.in