
मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा चौथ्या दिवशी गोंधळ कायम राहिला. प्रवेशासाठी राज्यभरातील विद्यार्थी अर्ज भरत असून त्यांना अर्ज भरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. संकेतस्थळ धीम्या गतीने चालणे, लॉगइन आयडी व पासवर्डचे संदेश न येणे, कोणी लॉगइन केले आहे, अस संदेश येणे तसेच अर्जाचा दुसरा भाग सुरूच न होणे अशा अनेक समस्यांनी विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला २६ मेपासून सुरुवात झाली. अर्ज नोंदणी करण्याच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळ धीम्या गतीने सुरू असल्याने विद्यार्थी व पालकांना त्रासाला सामोरे जावे लागले. तांत्रिक समस्या दूर होण्याची अपेक्षा असलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा अपेक्षाभंग झाला आहे. प्रथम विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यास अडचण येत होती. तसेच महाविद्यालयांचे पसंतीक्रम दिसत नव्हते. आता विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या लॉगइन आयडी व पासवर्ड मिळण्यातही अडचणी येत आहे. विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी व पासवर्डचा मेसेजच येत नसल्याने त्यांना अर्ज करताच येत नाही. वारंवार प्रयत्न केल्यानंतर अखेर त्यांना मेसेज आलाच तर त्यांचे लॉगइन अन्यत्र सुरू असल्याचा संदेश त्यांना दाखविण्यात येत आहे. तर ज्या विद्यार्थांचा पहिला भाग भरून होत आहे, अशा विद्यार्थ्यांना दुसरा भागच दाखवत नाही. या तांत्रिक अडचणीसाठी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसादच मिळत नाही. यासंदर्भात शिक्षण संचालक महेश पालकर यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालातील मदत कक्ष हतबल
अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी, हेल्पलाईन क्रमांकावर लवकर मिळत नसलेल्या प्रतिसादामुळे अनेक विद्यार्थी व पालक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात तक्रार घेऊन जात आहेत. तेथे तक्रार निवारण्यासाठी उभारलेल्या स्वतंत्र कक्षामध्ये दररोज साधारण ४० ते ५० तक्रारींची नोंद होत आहे. मात्र त्यांच्याकडे प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतेही अधिकार नसल्याने ते तक्रारी सोडविण्यासाठी हतबल ठरत आहेत. नोंद केलेल्या तक्रारींची माहिती ते पुण्यातील शिक्षण संचालकांच्या कार्यालयाला कळविण्याचे काम करत आहेत.