

मनोज रामकृष्णन/मुंबई
शिवसेनेच्या मुख्यालय हद्दीत असलेला जी-उत्तर पालिका प्रभागात दादर, शिवाजी पार्क, माटुंगा पूर्व, माहीम आणि धारावीचा समावेश होतो. हा मुंबईतील अनेक महत्त्वाच्या राजकीय लढतींचा केंद्रबिंदू राहिला आहे. प्रभागाच्या उत्तरेकडील भागात असलेली देशातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेली धारावी येत्या काही वर्षांत आधुनिक निवासी व व्यावसायिक जिल्ह्यात रूपांतरित होणार आहे. भूमिगत ‘ॲक्वा लाइन’वरील दादर, शीतलादेवी आणि धारावी ही तीन नवीन मेट्रो स्थानके सुरू झाल्यामुळे परिसराची शहराच्या इतर भागांशी जोडणी अधिक सुलभ झाली आहे.
९.०७ चौ. कि. मी. क्षेत्रफळात पसरलेल्या या प्रभागाची लोकसंख्या ५,९०,९०० आहे. शिवाजी पार्क, माटुंगा पश्चिम आणि माहीमसारखे उच्च-मध्यमवर्गीय निवासी भाग तसेच धारावी, माहीम आणि शाहू नगरमधील झोपडपट्ट्या अशी या परिसराची सामाजिक रचना आहे. हा भाग धार्मिकदृष्ट्याही विविधतेने नटलेला आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, माहीम दर्गा, सेंट मायकेल्स चर्च आणि शीतलादेवी मंदिर ही प्रमुख श्रद्धास्थळे येथे आहेत. माहीममध्ये कॅथलिक, मुस्लिम, पारशी आणि सिंधी वसाहती आहेत. धारावीमध्ये तमिळ, गुजराती कुंभार समाज, मुस्लिम आणि मराठी बोलणारे कोळी समाजाचे मच्छीमार राहतात.
कचरा, धुळीचा त्रास
परिसराची राजकीय व व्यापारी ओळख असली तरी रहिवासी समाधानी नाहीत. ‘अॅक्शन फॉर गुड गव्हर्नन्स अँड नेटवर्किंग इन इंडिया’ (अग्नि) या पारदर्शकता व उत्तरदायित्वासाठी काम करणाऱ्या अपक्ष संस्थेचे जी-उत्तर समन्वयक बुलू साल्दान्हा यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून निवडून आलेले नगरसेवक नसल्यामुळे पालिका सेवा वाईटावरून आणखी वाईट झाल्या आहेत. शिवाजी पार्कला लोकसंख्या जास्त असल्यामुळे थोडे लक्ष दिले जाते; पण विशेषतः माहीमला सावत्र वागणूक मिळते.
वाहतुकीचा प्रश्न
माहीम स्थानकाजवळ अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या टॅक्सींमुळे प्रवाशांना अडथळा येतो, असेही त्यांनी नमूद केले. श्री सिद्धिविनायक मंदिर आणि दादर स्थानक परिसरात वाहतुकीची समस्याही गंभीर आहे.
फेरीवाल्यांची समस्या
रस्त्यांवर अतिक्रमण करणारे बेकायदेशीर फेरीवाले ही या भागातील गंभीर समस्या आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला सेनापती बापट मार्गावरील एका बेकायदेशीर वाहन धुण्याच्या केंद्राविरोधात तक्रार केल्यामुळे चेतन कांबळे या तरुण सामाजिक कार्यकर्त्याला अमानुष मारहाण करण्यात आली. ‘चकाचक दादर’ या नागरी पहारेकरी समूहाचे संस्थापक असलेल्या कांबळे यांनी आरोप केला की, फेरीवाले, अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि जुगार यांसारख्या बेकायदेशीर संघटित टोळ्यांमार्फत चालवल्या जातात.
बाजारामुळे कचरा
दादरमधील भाजी, फुले आणि कापड बाजारातून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो, जो पूर्णपणे उचलला जात नाही. माहीम रेसिडेंट्स ग्रुपचे इरफान मच्छीवाला यांना दररोज सकाळी कचऱ्याने भरलेले रस्ते पाहावे लागतात. माहीम दर्गा, शीतलादेवी मंदिर आणि सेंट मायकेल्स चर्चसारखी मोठी श्रद्धास्थळे येथे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. संध्याकाळी ते निघून गेल्यावर रस्त्यांवर कचरा साचलेला असतो. रात्रीच्या वेळी रस्ते साफसफाईची गरज आहे. पालिका कार्यालयाकडून सांगितले जाते की, कचरा उचलण्यासाठी पुरेशी वाहने नाहीत, असे मच्छीवाला म्हणाले.