मी मुख्यमंत्री झाल्यापासून काही लोकं घराबाहेर पडतायत, पण... ; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नेत्याला जी -२० बैठकीचे निमंत्रण दिले होते. तरीही उद्धव ठाकरे यांनी अनुपस्थिती दर्शवल्याने केली टीका
मी मुख्यमंत्री झाल्यापासून काही लोकं घराबाहेर पडतायत, पण... ; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

भारताकडे जी - २० परिषदेचे अध्यक्षपद आले आहे. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी - २०बाबत देशातील सर्व नेत्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये देशातील अनेक नेत्यांनी सहभाग दर्शवला होता. याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. यावेळी, निमंत्रण असूनसुद्धा उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्षनेते अजित पवार हे बैठकीला अनुपस्थित राहिले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीका करत म्हंटले की, बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचे होते? हेच देशप्रेम आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.

जी - २०ची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांसमोर म्हणाले की, "जी-२० बद्दल झालेली बैठक ही देशासाठी भूषणावह आहे. या बैठकीला देशातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक पक्षांचे अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीचे निमंत्रण सगळ्यांनाच होते. बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना (उद्धव ठाकरे) काय दाखवायचे होते? हेच देशप्रेम आहे का? हेच त्यांचे राज्यावरचे प्रेम आहे का? मी मुख्यमंत्री झाल्यापासून काही लोकं घराबाहेर पडत आहेत. चार-पाच महिन्यांमध्ये आम्ही जे निर्णय घेतले त्यामुळे काही जणांना धडकी भरली. आजच्या महत्त्वाच्या बैठकीला ते गैरहजर होते, यावरून त्यांचे प्रेम दिसते." असे म्हणत त्यांनी टीका केली.

जी-२०मुळे महाराष्ट्राला होणार जागतिक फायदा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

"महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या चार ठिकाणी जी २० परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. यानिमित्त राज्याचे ब्रॅंडींग, राज्यातील विकासाचे प्रकल्प, आपली संस्कृती जगासमोर मांडण्याची संधी मिळाली आहे. यामुळे राज्यात गतीने कामे सुरू आहेत." अशा भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. राज्यामध्ये आतापर्यंत जी-२० परिषदेच्या संदर्भात झालेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून, त्यांनी राज्यात सुरू असलेल्या कामांबाबत माहिती दिली. तसेच जी २० बैठकीचे स्वरूप कसे असेल याबाबत याप्रसंगी सादरीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी काळ पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी १७ तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. राज्यपाल आणि राज्यकर्त्यांकडून सातत्याने महाराष्ट्राचा अवमान केला जात आहे, शिवरायांबद्दल सातत्याने बेताल विधाने केली जात आहेत, सीमावर्ती गावांवर कर्नाटक दावा करत आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला बाधा येत आहे, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in