गणपती आधीच मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

दीड महिन्यांचा पाणीसाठा कमी; २० टक्क्यांच्या कपातीची शक्यता
गणपती आधीच मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट
Published on

मुंबई : ऑगस्ट महिना कोरडा गेला त्यात सप्टेंबर महिन्यात वरुणराजा समाधानकारक न बरसल्यास मुंबईत पुन्हा एकदा पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरपर्यंत सात ही धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेत ९० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध असल्यास १० ते २० टक्के पाणी कपात करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या जल विभागाचे प्रमुख अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली. दरम्यान, दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सात ही धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येतो. यंदाच्या वर्षी दीड महिन्यांचा पाणीसाठा कमी असून, ९०.६९ टक्के पाणी साठा मे २०२४ पर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा अप्पर वैतरणा भातसा तानसा विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो; मात्र ३० जून रोजी सात ही धरणात ७ टक्के पाणी साठा उपलब्ध असल्याने १ जुलैपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली. परंतु जुलै महिन्यात वरुणराजाने धरण क्षेत्रात दमदार इनिंग केल्याने ८ ऑगस्ट रोजी पाणी कपात रद्द करण्यात आली; मात्र ऑगस्ट महिन्यात वरुणराजाने धरण क्षेत्राकडे पाठ फिरवली असून सप्टेंबर महिन्यात वरुणराजा समाधानकारक बरसेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सप्टेंबर १५ नंतर सात ही धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर नंतर ९० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध असल्यास १० ते २० टक्के पाणी कपात करण्यात येईल. तसा प्रस्ताव तयार करत आयुक्तांना सादर करण्यात येईल, असे ही ते म्हणाले.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. तर संपूर्ण मुंबई महानगराला वर्षभराची तहान भागण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा असावा लागतो.

सात धरणातील पाणीसाठा

( दशलक्ष लिटरमध्ये)

मोडक सागर - १,२५, ८४०

मध्य वैतरणा - १,८५,३२५

अप्पर वैतरणा - १,७७,९७८

भातसा - ६,४४,८००

तानसा - १,४३,०४

विहार - २७,६९८

तुळशी - ८,०२७

logo
marathi.freepressjournal.in