
मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीचे विसर्जन समुद्र, नैसर्गिक तलाव व नद्यांमध्ये करण्यास उच्च न्यायालयाची बंदी कायम आहे. त्यामुळे मुंबईतील लालबागच्या राजासह मोठ्या पीओपी गणेशमूतींचे विसर्जन करायचे कुठे, असा प्रश्न मुंबई महानगरपालिकेला पडला असून राज्य सरकारच्या धोरणानंतरच चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. मात्र, अद्यापही पीओपी मूर्तीच्या विसर्जनाबाबतचा तिढा सुटला नाही. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. परंतु राज्य सरकारकडून अद्याप विसर्जनाचे धोरण निश्चित न झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेला मोठ्या गणेशमूर्तीचे विसर्जन करायचे कुठे, असा प्रश्न पडला आहे.
राज्यातील अन्य शहरांपेक्षा मुंबईत दरवर्षी मोठ्या गणेशमूर्तीची संख्या वाढत आहे. यामध्ये १५ फुटांपासून ३० फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तीची संख्या सुमारे ६ ते ७ हजार आहे, तर अशा उंच मूर्तीचे कृत्रिम तलावांत विसर्जन करणे शक्य नाही. या मूर्तीसाठी समुद्र व मोठे नैसर्गिक तलाव हाच एकमेव पर्याय सध्या आहे. परंतु उच्च न्यायालयाची समुद्रासह नैसर्गिक तलावात पीओपी गणेशमूर्ती परवानगी नाही. यासाठी, राज्य सरकारकडून पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत धोरण निश्चित करण्यात येणार आहे. हे धोरण निश्चित झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल २३ जुलैला उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या धोरणानंतरच मुंबईतील गणेशमूर्ती विसर्जनाबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, मोठ्या मूर्तीसाठी पालिकेकडे कोणतीच पर्यायी व्यवस्था नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कृत्रिम तलाव उभारणे शक्य नाही
एखादे कृत्रिम तलाव तयार करून गणपतींचे विसर्जन करता येईल. परंतु शहरातील मोठ्या गणेशमूर्तीची संख्या लक्षात घेता, मोठ्या संख्येने कृत्रिम तलाव उभारणे शक्य नसल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मोठ्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाबाबत सरकार कोणता पर्याय देणार यावर मुंबईतील गणेशमूर्तीचे विसर्जन अवलंबून राहणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.