जीएसटीचा फटका गणेशमूर्तींना बसला;किमतीत २० टक्क्यांनी झाली वाढ

शिंदे सरकारने उत्सव साजरा करण्यावरील निर्बंध शिथिल केल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
 जीएसटीचा फटका गणेशमूर्तींना बसला;किमतीत २० टक्क्यांनी झाली वाढ

पेण हे गणपतीचे माहेरघर म्हणून जगात प्रसिद्ध असल्याने पेणमधून यंदा साधारणपणे २५ ते ३० हजार गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. केंद्र सरकारने सर्व वस्तूंवर जीएसटी लावल्यामुळे गणेशमूर्तीसाठी येणारा कच्चा मालही महाग झाल्याने त्यांच्या किमती जवळपास २० टक्क्यांनी वाढल्या आहेत; मात्र महाराष्ट्रातील नवनिर्वाचित शिंदे सरकारने उत्सव साजरा करण्यावरील निर्बंध शिथिल केल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

परदेशातील गणेशभक्तांकडून मूर्तीसाठी मागणी वाढत आहे. परिणामी, सध्या परदेशात पाठवल्या जाणाऱ्या गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये सुरू आहे. दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने गणेशोत्सवावरही निर्बंध होते. यंदा कोणतीही अट नसल्याने भक्तांकडून गणेशोत्सव आनंदात साजरा करण्यात येणार आहे.

पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे, अंतोरे, तांबडशेत, कळवे आदी ठिकाणी अनेक कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती तयार होत आहेत. तालुक्यातील जवळपास २५ ते ३० हजार गणेशमूर्ती मॉरिशस, थायलंड, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका, लंडन, बँकॉक आदी देशांत महिनाभर आधीच रवाना होत आहेत. गतवर्षी कोरोनामुळे रखडलेल्या बाप्पाच्या परदेशवारीला आता जोरात सुरुवात झाली आहे; परंतु महागाईचे ग्रहण गणेशोत्सवालाही लागले आहे.

जीएसटीचा भार वाढल्याने कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी पीओपी १७० रुपये होते ते आता २५० ते ३०० रुपये झाल्याने गणेशमूर्तीची किंमत आपोआपच वाढली आहे. किंमत वाढली तरी निर्बंध शिथिल झाल्याने गणेशोत्सवासाठी भक्तांची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in