

वसई : वसई-विरार शहरात दरवर्षी पावसाळ्यात येणारी पूरस्थिती रोखण्यासाठी पावसाळी पाण्याचा निचरा होणाऱ्या नैसर्गिक मार्गातील कांदळवने (मँग्रोव्ह) स्थळ पाहणी करून नियमानुसार खाडीत स्थलांतरित करावीत, असे निर्देश राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी सह्याद्री अतिगृहात आयोजित विशेष बैठकीत दिले.
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नालासोपारा व वसई मतदारसंघात स्वतंत्र मँग्रोव्ह पार्क उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही मंत्री नाईक यांनी दिल्या. या बैठकीला आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्यासह वन विभाग आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वसई-विरार मतदारसंघात दरवर्षी मुसळधार पावसानंतर पूरस्थिती निर्माण होते. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. या पूरस्थितीबाबत ‘सीएसआयआर-नीरी, आयआयटी-मुंबई’ संस्थेने अहवाल तयार केला होता. या अहवालाची राज्य सरकार व महापालिकेकडून अंमलबजावणी झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार राजन नाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत वसई-विरारमधील पूरस्थितीवर नियंत्रणासाठी विशेष आढावा बैठक घेण्याची मागणी केली होती.
त्यानुसार वन मंत्री गणेश नाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतल्याचे आ. नाईक यांनी सांगितले. या बैठकीस अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रामाराव, तहसीलदार वसई दीपक गायकवाड उपस्थित होते.
नीरी-आयआयटीच्या अहवालाची अंमलबजावणी करा !
वसई-विरारमधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सीएसआयआर-नीरी, आयआयटी-मुंबई यांनी तयार केलेल्या अहवालाची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही वन मंत्री गणेश नाईक यांनी दिल्या.