बोरीवलीकरांचे श्रद्धास्थान वझिऱ्याचा गणपती; हक्काच्या जागेच्या प्रतीक्षेत स्वयंभू श्रीगणेश

बोरीवलीतील वझिरा परिसरातील पुरातन श्री स्वयंभू गणेश देवस्थान हे प्रति सिद्धिविनायक मानले जाणारे उपनगरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान सरकारकडून हक्काची जागा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.
बोरीवलीकरांचे श्रद्धास्थान वझिऱ्याचा गणपती; हक्काच्या जागेच्या प्रतीक्षेत स्वयंभू श्रीगणेश
Published on

रवींद्र राऊळ/मुंबई

बोरीवलीतील वझिरा परिसरातील पुरातन श्री स्वयंभू गणेश देवस्थान हे प्रति सिद्धिविनायक मानले जाणारे उपनगरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान सरकारकडून हक्काची जागा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. गेले तीन दशके अथक प्रयत्न करून आणि प्रत्येक सरकारकडून वेळोवेळी आश्वासने मिळूनही याबाबत अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

बोरीवली स्थानकापासून पश्चिमेला पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेले शिळाखंडावरील हे स्वयंभू गणेशाचे स्थान गेल्या पन्नास वर्षांत उपनगरातील वस्ती वाढत गेली तसतसे विशेष प्रसिद्धीस आले. सुरुवातीस वझिरा आणि बाभई या दोन गावठाणांचे कोळी, आगरी आणि सोमवंशीय क्षत्रिय पाठारे (पाचकळशी) समाजाचे मूळ भूमिपुत्र या स्वयंभू स्थानास भजत. स्वयंभू स्थाने इतकी स्पष्ट नसतात. मात्र, हा गणपती पूर्ण आकाराचा आणि अगदी स्पष्ट दिसतो. या शिळाखंडाचा आकार उभ्या असलेल्या हत्तीप्रमाणे भासतो. त्याच्या डाव्या डोळ्याच्या जागी स्वयंभू गणेशाची मूर्ती साऱ्या

अवयवांसह आहे. गजपाषाणाच्या उत्तरेकडे ‘श्री’चे स्थान आहे, त्या पाषाणावर ग्रामस्थांनी प्रथम छप्पर बांधले. नंतर त्यात बऱ्याच सुधारणा होत गेल्या. पूर्वी हा शिलाखंड पाण्याच्या दलदलीत होता तेव्हा अक्षरशः भक्तांना मान उंच करून दर्शन घ्यावे लागे. पण नंतर स्थानिक ग्रामस्थांनी जमिनीत भराव घालून ती मूर्ती दर्शन घेण्यासारखी केल्याने आता अगदी सहजपणे 'श्रीं'चे दर्शन घेता येते. मंदिराच्या उजव्या कोपऱ्यात साफ केलेले फरसबंद तळे असून ते अधिकाधिक नैसर्गिकरित्या आकर्षक बनवलेले आहे. मंदिराच्या पाठीमागे सुंदर पुष्पवाटिका विकसित केलेली आहे. गणेशास आणि बाजूच्या हनुमानास प्रदक्षिणा घालण्यासाठी मोकळी सुटसुटीत जागा उपलब्ध करून बाकी सारी जागा सभागृह म्हणून वापरली जाते. तेथे धार्मिक कार्यक्रम केले जातात. मंदिराच्या पश्चिमेस ग्रामस्थांचे कुलदैवत 'श्री आलजी देव' मंदिर आहे.

गणपतीच्या उत्सवाव्यतिरिक्त येथे इतरही बरेच प्रासंगिक उत्सव येथे साजरे होतात. त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम केले जातात. तसेच शक कालाप्रमाणे आश्विन कृष्ण अष्टमीला माता शितळादेवीचा उत्सव साजरा करण्यात येतो व देवीची पालखी संपूर्ण गावात फिरून पुन्हा मंदिरात येते. सामाजिक भान बाळगत मंदिर व्यवस्थापनातर्फे राज्यात येणारे पूर अथवा दुष्काळग्रस्तांना सढळ हस्ते मदत केली जाते. त्याचप्रमाणे जयराज नगर येथे आरोग्य केंद्रासाठी जागा घेण्यात आली आहे. व्यायामशाळा, शालेय मार्गदर्शन असे उपक्रम येथे राबवले जातात. वेळोवेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतही निधी दिला जातो.

भाविकांचा लढा अधुराच

पूर्वीपासून या देवस्थानाच्या ताब्यात पाच हजार चौ.मी.पेक्षा अधिक जागा होती. १९७४ साली सरकारी जागेतील देवस्थानाच्या श्री गणेश ग्रामस्थ सेवा मंडळाची नोंदणी करण्यात आली. १९७६ सालापासून महापालिकेला कर दिला जात आहे. १९९५ साली शहर नियोजन आरखड्यात गणेश मंदिरासाठी आणि लगतच्या मनोरंजन पार्कसाठी केवळ २,०२१ चौ.मी. इतकी जागा राखीव ठेवण्यात आली. देवस्थानाच्या ताब्यातील उर्वरित जागा सरकारी अधिकाऱ्यांनी निवासी इमारतींसाठी बळकावली. त्याविरोधात स्थानिक नागरिकांनी दिलेला लढा अधुराच राहिला आहे.

त्यानंतर देवस्थानची जागा मंडळाला विकत द्यावी यासाठी सरकारदरबारी सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यावर ही मोक्याची जागा सध्याच्या बाजारभावाने आणि त्यावर पाचपट दंड आकारून विकत देण्याची तयारी सरकारने दाखवली. कोकण आयुक्तांनी ते अयोग्य असल्याचे महसूल आयुक्तांना कळवत १९७४ साली मंडळाची नोंदणी झाली त्यावेळच्या दराने जागा विकत देण्याची शिफारस केली. दोन वर्षांपूर्वी महसूल विभागाने त्यावर अधिवेशनात चर्चा व्हावी, सध्याच्या बाजारभावाने अथवा कोकण आयुक्तांच्या शिफारशीनुसार जुन्या दराने द्यावी, अशा तीन पर्यायांपैकी एक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, अद्याप निर्णय काही घेण्यात आलेला नाही. सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांना भेटून मंडळातर्फे प्रयत्न केले जात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in