'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष
मुंबई : हिंदू धर्मातील सर्व देवतांमध्ये आद्यपूजेचा मान असलेल्या गणरायाच्या उत्सवाला शनिवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडपातील गणपती अशा दोन रूपांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे घरोघरातील मंडळी जशी गणरायाच्या स्वागतासाठी लगबग करत आहेत त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळांतील कार्यकर्त्यांचीही धावपळ सुरू आहे. घरी येणाऱ्या बाप्पाच्या स्वागतासाठी घराघरात मंगलमय वातावरण आहे. आपल्या जीवनातील दुःख, चिंता येते दहा दिवस बाजूला ठेवून मुंबईसह महाराष्ट्रातील घराघरातील भक्तगण गणरायाच्या सेवेसाठी तल्लीन होणार आहेत.
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो. यंदा गणेश चतुर्थीचा उत्सव शनिवार, ७ सप्टेंबरपासून साजरा होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात विधिवत पूजा करून गणपतीची स्थापना केली जाते. गणपती घरी बसवल्यास सौभाग्य वाढते, असे म्हणतात. दीड, पाच, सात, दहा, अकरा व एकवीस दिवस गणपतीची प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा करतात.
गणेशोत्सवानिमित्त गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वा, जास्वंद आदी फुलांना प्रचंड मागणी आहे. गणपतीला लागणारी कंठी, मुकुट, वेगवेगळ्या प्रकारची आभूषणे आदींची खरेदी सुरू आहे. गणपतीला लागणाऱ्या वस्त्रांच्या खरेदीसाठी भक्तांच्या गर्दीने बाजारपेठा फुलल्या आहेत. विविध सुगंधांच्या अगरबत्ती, कापूर, धूप यांची बाजारात मागणी वाढली आहे. पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या पंचामृतातील साहित्याचीही खरेदी सुरू आहे.
कोकणात गणेशोत्सवाची धूम
मुंबई, पुण्यासह गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. त्यापेक्षाही कोकणातील घराघरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. कोकणात गणपती येणार म्हणजे, आपल्या घरी मोठा पाहुणाच येणार आहे, अशा थाटात त्याच्या पाहुणचाराची तयारी केली जाते. मुंबईसह अन्य भागात राहणारे कोकणवासी चतुर्थीनिमित्त कोकणातील आपापल्या गावात जाऊन मनोभावे गणरायाची पूजा करतात. वर्षभर न भेटलेले आपले आप्त, भावंडे या गणेशोत्सवाला नक्कीच भेटणार हा हेतू त्यामागे असतो. कोकणात आजही पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. कोकणात गणेश मूर्तीसाठी माटी बांधली जाते. माटीला बांधण्यासाठी स्थानिक पानं-फुलं-फळं गोळा केली जातात. ऐनाच्या दोरीने आंब्याचे टाळे, सुपारीचे घोस माटीला बांधले जातात. तसेच घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात. देवाला रोज नैवेद्य दाखवला जातो. घराघरात रात्री भजनबाऱ्या रंगतात. लहान मुलांची नृत्ये व महिलांच्या फुगड्याही रंगतात.
खरेदीसाठी गर्दी
लालबाग, परळ, दादर आदी भागात शुक्रवारी खरेदीसाठी गर्दी उसळली होती. सायंकाळी उशिरापर्यंत खरेदीचा जोर होता. दुसरीकडे दादरच्या छबिलदास रोड व छबिलदास बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होती. दिव्यांच्या रोषणाईची मागणी अधिक दिसली. छबिलदास भागात दिव्यांचा घाऊक बाजार आहे. त्यामुळे तेथून आकर्षक दिव्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. इलेक्ट्रानिक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर दिव्याच्या सजावटीसाठी गर्दी झाली होती. सजावटीसाठी वेगवेगळे प्रकार सध्या बाजारात आले आहेत. दिवेरोषणाईत माळांसह एलईडी दिव्यांचे घुमट, डान्सिंग दिवे, एलईडी फोकस, एलईडी दिव्यांची पेन्सिल, ओम, श्री व स्वस्तिक किंवा गणपतीच्या आकारातील एलईडी दिव्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. सर्व रोषणाई एलईडी दिव्यांची असल्याने ऊर्जाही बचत होते. क्रॉफर्ड मार्केट, भायखळा मार्केट, दादर आदी बाजारपेठांतही गर्दी उसळली होती. एकीकडे खरेदीसाठी गर्दी, तर दुसरीकडे बाप्पांच्या आगमनाच्या तयारीचा उत्साह शिगेला पोहचला होता.
पूजेच्या साहित्यासाठी झुंबड
दादरसह मालाड, बोरिवली, भांडुप, घाटकोपर, विलेपार्ले, मुलुंड, क्राफर्ड मार्केट, दादर आदींसह प्रमुख भागांत फेरीवाल्यांनी आपल्या व्यवसायाशेजारी गणेशोत्सवासाठी अगरबत्ती, धूप, कापडी फुले व त्यांची तोरणे, लाडू, मोदक, फुटाणे, टाळ, निरांजन, समई तसेच सजावटीसाठी आवश्यक असणारे आकर्षक कपडे, पडदे, विजेचे दिवे, तोरण आदींचे स्टॉल्स लावले आहेत. दादरमधील पदपथ या गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूच्या सामानांच्या स्टॉल्सनी खुलून गेले आहेत, तर डिसिल्व्हा रोड कपडे आणि फळांनी, तर स्टेशनपासून ते रानडे मार्ग आणि छबिलदास गल्ली तर आकर्षक फुलांनी आणि कंठ्या, हार आणि फुलांच्या लडी तसेच मखरांनी बहरून गेली आहे. यंदा विधानसभेच्या निवडणुका असल्याने गणपतीच्या देखाव्यांमध्ये राजकीय आशय असण्याची शक्यता आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात विविध प्रकारचे देखावे पाहण्याचे नियोजन घरांमध्ये सुरू आहे.
कडक पोलीस बंदोबस्त
गणेशोत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज आहेत. येते ११ दिवस पोलिसांची परीक्षाच असेल. ते आव्हान पेलण्यासाठी पोलीस सदैव तत्पर असतात.
मुंबईत उत्साह
मुंबई - कुटुंबातील आबालवृद्धांच्या अत्यंत लाडक्या गणरायाचे आगमन शनिवारी होत असून संपूर्ण मुंबापुरीत गणेशोत्सवाचा उदंड उत्साह शुक्रवारी सायंकाळी दिसून आला.
ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत बाप्पाचे स्वागत करण्यासाठी मुंबई नगरी आधीपासूनच सज्ज झाली आहे. गणपती बाप्पांसाठी पूजेचे साहित्य, फुले, फळे आदी साहित्याने बाजारही फुलून गेले आहेत.
मुंबईचे रस्ते, चौक, चाळींच्या गल्ल्या भक्तिमय वातावरणात बुडाल्या आहेत. गणेशोत्सवासाठी पोलीस, पालिका आदी यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत.
सार्वजनिक मंडळांच्या मंडपांसमोर संपूर्ण १० दिवस विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिरे, विविध स्पर्धा, सामाजिक विषयांवर जनजागृतीपर कार्यक्रम, पथनाट्य आदी कार्यक्रमांची रेलचेल सुरू होणार आहे.
२५ हजार कोटींची उलाढाल
गणेश चतुर्थीनिमित देशात २५ हजार कोटींची उलाढाल होणार आहे. भारतीय व्यापारी या सणानिमित्त भारतीय वस्तूंना प्राधान्य देत आहेत. गणेश चतुर्थीत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि गोव्यात मोठी उलाढाल होते, असे आघाडीच्या व्यापारी संघटनेने म्हटले आहे. देशात २० लाखांहून अधिक गणेश मंडप आहेत. प्रत्येक मंडपात ५० हजार रुपये खर्च केला तरीही त्याचाच आकडा १० हजार कोटी रुपये होतो.