दीड दिवसांच्या गणरायाला निरोप

बाप्पाच्या आगमनाने राज्यातील वातावरण भक्तिमय झाले असून दीड दिवसांच्या गणरायाला रविवारी आनंदाश्रूंनी निरोप देण्यात आला
दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
Published on

मुंबई : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर विधिवत पूजाअर्चा करत लाडक्या गणरायाची शनिवारी घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाच्या आगमनाने राज्यातील वातावरण भक्तिमय झाले असून दीड दिवसांच्या गणरायाला रविवारी आनंदाश्रूंनी निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’ या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६ हजार ९४१ गणेश मूर्तींचे चौपाटी व कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्ती विसर्जनाच्या संख्येत वाढ झाली. दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव देशभरात साजरा करण्यात येतो. परंतु महाराष्ट्रात विशेष करून मुंबईत गणेशोत्सवाची आगळीवेगळी धूम असते.

लाडक्या गणरायाच्या आगमनाआधी बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरीत दोन-तीन महिने आधीच तयारी सुरू होते. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर शनिवार, ७ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत आगमन झाले.

दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा आणि जिंका मोठी बक्षिसे

गणेश चतुर्थी दिवशी मोठ्या भक्तिभावाने श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह हजारोंच्या संख्येने घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दीड दिवस घरात मनोभावे पूजाअर्चा केली आणि बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली, त्यावेळी घरातील लहानग्यांपासून मोठ्यांना आश्रू आवरता आले नाही. रविवारी दुपारनंतर घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणेश मूर्तींच्या विसर्जनास सुरुवात झाली. दुपारनंतर मुंबईच्या विविध भागात हे विसर्जन सुरू झाले. ढोल-ताश्यांचा गजर, लेझिम पथकांच्या साथीने बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला.

७ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन

रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील एकूण ६,८९४ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात ३७ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन विविध चौपाट्यांवर करण्यात आले.

कृत्रिम तलावांना पसंती

कृत्रिम तलावात सार्वजनिक २२, घरगुती ३१३४ व ६ हरितालिका अशा एकूण ३१६२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in