
मुंबई : मुंबईसह राज्यात दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन व शनिवारी धुमधडाक्यात निर्विघ्नपणे पार पडले. मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळखला जाणारा गणेश गल्लीतील 'मुंबईचा राजा'ची, तसेच मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागच्या राजा'ची शनिवारी दुपारी १२.३० वाजता वाजतगाजत मिरवणूक निघाली. कोळी बांधवांनी पूजाअर्चा केल्यानंतर ढोल ताशांचा गजर, फुले व गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या दिमाखात गणपती बाप्पाची मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघाली. यावेळी इच्छापूर्ती बाप्पाची एक झलक डोळ्यात सामावून घेण्यासाठी लाखो भक्तांचा जनसागर रस्तोरस्ती व गिरगाव चौपाटीवर उसळला होता.
गणरायाच्या लाडक्या स्वागतासाठी भक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबईत तर गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. दरवर्षी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण मुंबईत येत असतात. उंचच उंच मूर्ती, आकर्षक देखावे हे भक्तांसाठी पर्वणी असतात. हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता श्री गणेशाची यंदा २७ ऑगस्ट रोजी घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत प्रतिष्ठापना करण्यात आली. मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून दोन लाखांहून अधिक घराघरात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येते.
दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा करण्यात येते. मात्र, बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते त्यावेळी भक्तांना अश्रु अनावर होतात. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मुंबईत मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत व विसर्जन पार पडले. २७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थात दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. दीड दिवसांचे बाप्पा, पाच दिवसांचे बाप्पा, सात दिवसांच्या बाप्पासह गौरींचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. गेले १० दिवस मुंबईतील वातावरण भक्तिमय झाले होते.
शनिवारी ६ सप्टेंबरला सकाळपासून १० दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबापुरी रस्त्यावर उतरली होती. मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या गणेश गल्लीतील बाप्पाची मिरवणूक निघाल्यानंतर 'लालबागच्या राजा'ची मिरवणूक निघाली. दहा दिवसांत लालबागच्या राजाचे दर्शन घेणे शक्य झाले नाही, त्यांनी लालबागच्या राजाची सुबक, आकर्षक, उंच गणेशमूर्तीची एक झलक डोळ्यात सामावून घेण्यासाठी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे लालबागमध्ये भक्तांची अलोट गर्दी उसळली होती.