
मुंबई : सार्वजनिक श्रीगणेशोत्सव आणि इतर उत्सवांबाबत उच्च न्यायालयाने तसेच केंद्रीय प्रदूषण मंडळाने महापालिकेला मूर्ती विसर्जनाबाबतची एसओपी ठरवून दिली आहे. या कार्यपद्धतीच्या आधारे मूर्ती विसर्जन पश्चात पुनर्प्राप्ती आणि पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच वाहतुकीबाबतही पालिकेने एसओपी जाहीर केली आहे.
पर्यावरणाला अनुसरून सण तसेच उत्सव साजरे करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील विविध मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. यामध्ये मूर्ती विसर्जनाच्या बाबी निश्चित करून देण्यात आल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित झाल्यानंतर त्यांची पुनर्प्राप्ती करणे, नंतर पुनर्प्रक्रिया करणे, त्याच्या शास्रोक्त पद्धती कोणकोणत्या असू शकतात, हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ समिती गठित करण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आले.
विसर्जनानंतर पुनर्प्राप्त केलेल्या सर्व मूर्तींची, पुनर्प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या ठिकाणापर्यंत (डायघर, शिळफाटा) वाहतूक करण्यासाठी दर निश्चित करून देण्यात आले आहेत. शहर विभागासाठी १०० किलोमीटर अंतराकरिता ९,६२८ रुपये; पूर्व उपनगरांसाठी ८० किलोमीटर अंतराकरिता ८,७८८ रुपये आणि पश्चिम उपनगरांसाठी १०० किलोमीटर अंतराकरिता ९,६२८ रुपये असे आधारभूत दर ठरवून देण्यात आले आहेत. या दरांमध्ये वाहन चालक खर्च, कामगार खर्च, इंधन, परिरक्षण खर्च, पथकर (टोल), वाहनतळ, विमा आणि इतर सर्व अनुषंगिक खर्च समाविष्ट करून ते निश्चित करण्यात आले आहेत. तसेच यासाठी किमान तीन कामगार नेमणे आवश्यक राहणार आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
मूर्ती २४ तासांच्या आत बाहेर काढणार
विसर्जित झालेल्या सर्व मूर्ती २४ तासांच्या आत बाहेर काढाव्यात. लहान आकाराच्या मूर्ती काढण्यासाठी मनुष्यबळास हातमोजे (ग्लोव्ह्ज), जलसंरक्षक बूट इत्यादी संरक्षक साधने पुरवावीत, मोठ्या मूर्ती काढण्यासाठी क्रेनसारख्या संयंत्रांचा उपयोग करावा. तसेच पुनर्प्राप्त केलेल्या सर्व मूर्तींचा योग्यपणे दस्तावेज तयार करण्यात येणार आहेत.