मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांत २००९ पासून शंभर टक्के वाढ केली जाईल, तसेच त्यापैकी पन्नास टक्के इतकी थकबाकीची रक्कम येत्या गणेशचतुर्थीच्या आधीच अदा केली जाईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कर्मचारी संघटनांना सोमवारी दिली.
त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सवाचा आनंद शतगुणित होणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये २००९ पासून सुधारणा करण्यात आली नव्हती. आता मात्र भत्त्यांमध्ये शंभर टक्के वाढ करून सुधारणा करण्याचे आयुक्त व प्रशासक गगराणी यांनी मान्य केले आहे. त्यापोटीची ५० टक्के थकबाकी गणेश चतुर्थीच्या आधी देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. ही पालिका कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवासाठी मिळालेली भेट असणार आहे, असे कामगार नेत्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्यय समितीतर्फे बाबा कदम, ॲड. प्रकाश देवदास, अशोक जाधव, वामन कविस्कर, दिवाकर दळवी आणि इतर कामगार नेत्यांनी गगराणी यांची सोमवारी भेट घेतली. त्यांनी आयुक्तांपुढे विविध मागण्या मांडल्या. त्यातील बहुतांश मागण्या आयुक्तांनी मान्य केल्याचे या कामगार नेत्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त ( शहर) अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कंत्राटी कामगार-कर्मचारी यांना पालिका सेवेत घेताना पोलिसांकडून चारित्र्याचा दाखला घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी मान्य केले.
गटविमा योजना, भरती वगैरे...
> पालिका कर्मचाऱ्यांसाठी येत्या १ सप्टेंबरपासून नवीन गटविमा योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी वार्षिक २२३ कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.
> पालिकेत वेतनविसंगती दूर करण्यासाठी नेमलेल्या रामनाथ झा समितीच्या अहवालाची लवकरच अंमलबजावणी केली. त्याचप्रमाणे उर्वरित कर्मचाऱ्यांच्या वेतन विसंगतीवर पुन्हा चर्चा होणार आहे.
> अनुकंपा तत्त्वावरील भरती (पी.टी. केसेस) तसेच प्रकल्पग्रस्तांची भरती करण्यात येईल.
> रुग्णालय, घनकचरा व्यवस्थापन या अत्यावश्यक सेवांमध्ये तत्काळ भरती करण्यात येईल.