पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदीच! गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या खोलीकरणासह सुविधा

माघी गणेशोत्सवातील गणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीत होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अतिरिक्त सुविधा पुरवल्या असून आवश्यक तेथे कृत्रिम तलावांचे खोलीकरण करण्यात आले आहे.
पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदीच! गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या खोलीकरणासह सुविधा
Published on

मुंबई : माघी गणेशोत्सवातील गणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीत होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अतिरिक्त सुविधा पुरवल्या असून आवश्यक तेथे कृत्रिम तलावांचे खोलीकरण करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनासमवेत मिळून मूर्ती विसर्जन मिरवणुकांसाठी मार्गांचे नियोजन केले आहे. तसेच उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे अशा सूचना देत पीओपी गणेशमूर्तीवर बंदी असल्याचे मुंबई महापालिकेने पुन्हा अधोरेखित केले.

माघी गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) बनविलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करणार नाही, या अटीचे प्रामुख्याने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी पालन करणे आवश्यक आहे. तसेच सर्व घरगुती गणेशमूर्ती देखील पर्यावरण पूरक साहित्यापासून घडविलेल्या असाव्यात. त्यानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची हमी संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महानगरपालिकेकडे हमीपत्राच्या माध्यमातून दिली.

काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्तींची उंची अधिक असल्याने नैसर्गिक विसर्जन स्थळांवर योग्य रितीने मूर्ती विसर्जन होईल, कृत्रिम तलावांची क्षमता पुरेशी नसल्याचे मंडळांचे म्हणणे होते. ही बाब लक्षात घेता, उंच असलेल्या गणेशमूर्तींचे देखील विसर्जन सुलभ, योग्य रितीने व्हावे, यासाठी महानगरपालिकेने ठिकठिकाणी, स्थानिक गरजेनुसार सोयींमध्ये अतिरिक्त वाढ केली. परिमंडळ-७ मध्ये आता फक्त नऊ गणेशमूर्तींचे विसर्जन शिल्लक आहे. सर्व मूर्तींची उंची आदी बाबी लक्षात घेऊन संबंधित कृत्रिम तलावांचे खोलीकरण करण्यात आले आहे. तसेच पोलीस प्रशासनासमवेत मिळून विसर्जन मिरवणूक मार्गांचे नियोजन करण्यात आले आहे. परिमंडळ-४ अंतर्गत गोरेगांव परिसरातील बांगूरनगर येथे ३० बाय ३० आकाराचा कृत्रिम तलाव आहे. पोलीस प्रशासनाच्या नियोजनानुसार तेथे देखील विसर्जनासाठी मूर्ती नेण्यात येणार आहेत, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in