
‘बोल बोल..२२ फूट मुंबईच्या राजाचा विजय असो!’ हा जयजयकार कानी घुमला तर निश्चित डोळ्यासमोर येतो तो लालबाग गणेशगल्ली येथील मुंबईचा राजा. कायम आपल्या हटके अंदाजात, वेगवेगळ्या देखाव्यात भक्तांसमोर येणाऱ्या गणेशगल्लीच्या राजाचे यंदाचे ९५वे वर्ष आहे. दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे साधेपणाने साजरा होणारा गणेशोत्सव यंदा निर्बंधमुक्त असल्याने मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या लालबाग येथील गणेशगल्ली मंडळाने आपल्या राजासाठी यंदा १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वारााणसीतील काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वाधिक जुने आणि मानाचे मुंबईतील गणपतींपैकी एक असलेल्या गणेशगल्लीच्या राजासाठी संपूर्ण वर्ष गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतात. गणेशगल्ली येथे देशातील विविध धार्मिकस्थळांच्या हुबेहुब प्रतिकृती प्रतिवर्षी साकारण्यात येतात. लाखो भक्तांसाठी हे कायम प्रमुख आकर्षण राहिले आहे. कधी वेगवेगळ्या सामाजिक संकल्पनांवर आधारित देखावे, तर कधी धार्मिक वातावरणाचे संदेश देण्याचे कार्य दरवर्षी गणेशगल्ली मंडळातर्फे करण्यात येते.
२००२ या अमृतमहोत्सवी वर्षी भव्य मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती साकारत या मंडळाने स्वतःला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. तेव्हापासून आजतागायत देशातील धार्मिक देवस्थळांच्या वेवेगळ्या प्रतिकृती साकारत भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचे काम हे मंडळ करत आहे. यंदादेखील या परंपरेला पुढे नेत हे मंडळ १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वाराणसी येथील काशी विश्वनाथ (विश्वेश्वर) मंदिर मंदिराची भव्य प्रतिकृती साकारत आहे. ऊन-पावसाचा मारा अंगावर झेलत शेकडो कर्मचारी याठिकाणी दिवसरात्र देखावा साकारत आहेत.