
काल जवळपास प्रत्येक घरी अगदी धुम धडाक्यात गणरायाचं आगमन झालं. त्यानंतर आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. आज घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. कृत्रिम तलाव आणि सार्वजनिक नैसर्गीक विसर्जन स्थळांवर आज दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. राज्यातही विविध ठिकाणी प्रशासनांकडून विसर्जनासाठी लागणारी योग्य ती तयारी केली जातं आहे. तर दुसरीकडे गणेश भक्तांकडून बाप्पांना वाजत, गाजत निरोप देण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेने प्रत्येक विभागात कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. जेणेकरून नागरिकांना गैरसोय होणार नाही. नागरिकांनी या कृत्रिम तलावात बाप्पांचं विसर्जन करावं, असं आवाहनही मुंबई महापालिकेने केलं आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीला स्वयंवसेवी संस्थादेखील दाखल झाल्या आहेत. त्याशिवाय, विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणतीही अयोग्य घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला आहे.
यावेळी स्टिंग रे, जेलीफिशपासून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन देखील पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांच्या दरम्यान मुंबईच्या समुद्र किनारी स्टिंग रे, जेलीफिशच आढळून येतात. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी समुद्र किनारी येणाऱ्या गणेश भक्तांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.