मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत समस्यावर परखड भाष्य करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा उद्देशाने काही गणेशोत्सव मंडळे कार्यरत असून सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. त्यात भांडुपच्या मराठा मित्र मंडळाचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. मराठा मित्र मंडळाने यंदा ‘मोतीबिंदूमुक्त भांडुप’ हा उपक्रम सुरू केला असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मागील दोन महिन्यांपासून मराठा मित्र मंडळ सध्या मंडळाच्या वतीने ‘मोतीबिंदूमुक्त भांडुप’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी दरमहिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी मंडळामार्फत वैद्यकीय शिबीर भरविण्यात येत आहे. या मोतीबिंदूमुक्त भांडुप मोहिमेअंतर्गत मंडळाच्या ठिकाणी रुग्णांची तपासणी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले जाते. तेथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्णांना पुन्हा त्यांच्या घरी सोडण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सामाजिक संस्थेमार्फत हा निशुल्क उपक्रम मंडळ राबवत असल्याची माहिती मंडळाचे सरचिटणीस दिवेश गोरीवले यांनी दिली.
भांडुप पश्चिमेला असलेल्या मराठा मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९८१ मध्ये झाली. पर्यावरण रक्षणाचा वसा घेत मंडळाने २०२२ पासून १८ फुट उंचीची कागदी मूर्ती आणण्यास सुरुवात केली असून ही प्रथा आजतागायत सुरू आहे. यापूर्वी मंडळाने रामायण, विक्रम वेताळ, स्त्रीभ्रूण हत्या यासारख्या अनेक विषयांवर देखावे केले आहेत. त्यासाठी मंडळाला अनेक परितोषिके मिळाली आहेत. मंडळ गेल्या ५ ते ६ वर्षांपासून देखावा न करता राज महल उभारत आहे. यंदा मंडळाने ४४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही गणेशाचे आगमन १५ ऑगस्ट रोजी झाले आहे.
सामाजिक बांधिलकी
-मोफत वृत्तपत्र वाचनालय
-दरवर्षी विभागातील गरजू गरीब मुलांना वह्या-पुस्तके वाटप
-विभागातील गरजू गरीब रुग्णांसाठी शहरातील नामांकित रुग्णालयांमध्ये मोफत नेत्रोपचार, आतापर्यंत २०० रुग्णांची तपासणी ३० रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत.
-दत्तक योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील कल्हे गावमधील आदिवासी पाड्यांमध्ये आरोग्य चिकित्सा शिबिरे
-व्यसनमुक्ती शिबिरांचे आयोजन.