
मुंबई : गणपतीची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी शुक्रवारी आपापसात हाणामारी केली. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, यावर मुंबई मनपा ठाम आहे. यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत पीओपीने मूर्ती बनवणारे मूर्तिकार व शाडूची मूर्ती बनवणारे मूर्तिकार यांच्यात जोरदार हाणामारी झाली.
त्यांनी एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या फेकल्या. पीओपी मूर्तीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या वसंत राजे यांना बैठकीनंतर रस्त्यावर मारहाण झाली. याप्रकरणी त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवर बंदी घालण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महापालिका आणि पोलिसांनी यंदाच्या माघी गणेशोत्सवात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमधील गणेशोत्सवातही करण्यात येईल. यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने पालिकेच्या परळच्या कार्यालयात मूर्तिकारांची बैठक बोलावली होती.
यात केवळ मुंबईतील शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारणारे मूर्तीकार आणि पीओपी मूर्तीचे निर्माते सहभागी झाले होते. दरम्यान, या बैठकीत चर्चेऐवजी हाणामारीच झाली. ही बैठक सुरू होण्यापूर्वीच शाडू मातीपासून मूर्ती साकारणारे मूर्तीकार आणि पीओपीचे कारागीर एकमेकांना भिडले. सुरुवातीला त्यांनी एकमेकांवर शेरेबाजी केली. त्यानंतर शाब्दिक चकमक झाली आणि एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या, माईक, खुर्च्या फेकण्यात आल्या. या वादातच पालिका अधिकारी आणि मूर्तिकार यांच्यात बैठक पार पडली. सर्व मूर्तिकारांचे प्रतिनिधी महापालिकेतून बाहेर पडले. मात्र, पीओपी मूर्ती विरोधात भूमिका घेणारे वसंत राजे यांच्यावर रस्त्यात दोघांनी हल्ला केला. दरम्यान, काही मूर्तिकारांनीही आपल्याला मारहाण केली, असा आरोप राजे यांनी केला. या मारहाणीत राजे यांच्या डोक्याला, ओठाला, छातीला मार लागला आहे. राजे यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून केईएम रुग्णालयात त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असेल, असे पालिका प्रशासनाने बैठकीत जाहीर केले. पीओपी मूर्ती घडवण्यास पूर्णतः मनाई असेल, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. शाडूच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच मंडपासाठी परवानगी दिली जाईल व शाडूची माती पुरवली जाईल, असेही जाहीर करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची १०० टक्के अंमलबजावणी केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार यंदाचा श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी मुंबई मनपाचा प्रयत्न आहे. त्यानुसार मूर्तिकारांना मंडपांसाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्वावर जागा आणि मूर्ती साकारण्यासाठी शाडू माती मोफत पुरविण्यात येणार आहे. याचा वापर करून मुंबईतील मूर्तिकारांनी पर्यावरणपूरक मूर्ती तयार करून गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे. तसेच मूर्तिकारांना उद्भवत असलेल्या समस्या प्रशासकीय विभाग स्तरावर सोडविण्यात येतील, असेही सपकाळे यांनी सांगितले.
कोकण विभागीय आयुक्तांनाही पत्र
कोकण महसूल विभागातील जिल्ह्यांमध्ये पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यासाठी मूर्तिकारांना प्रोत्साहन द्यावे व शाडूची माती उपलब्ध करावी, असे पत्र कोकण विभागीय आयुक्तांनाही पाठवले असल्याचे मुंबई मनपाने सांगितले.