बाप्पाच्या कंठीहार खरेदीसाठी भक्तांची लगबग; मोती, गोल्ड व डायमंडमध्ये आकर्षक डिझाईन

लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली असून गणेश मूर्तीसाठी लागणाऱ्या विविध अलंकारांनी बाजार सजले आहेत. गणेशोत्सवात कंठीहाराला विशेष मागणी असते.
बाप्पाच्या कंठीहार खरेदीसाठी भक्तांची लगबग; मोती, गोल्ड व डायमंडमध्ये आकर्षक डिझाईन
Published on

मुंबई : लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली असून गणेश मूर्तीसाठी लागणाऱ्या विविध अलंकारांनी बाजार सजले आहेत. गणेशोत्सवात कंठीहाराला विशेष मागणी असते. मोती, गोल्ड डायमंड अशा विविध आकर्षक डिझाईनमधील कंठी हार खरेदीसाठी भुलेश्वर येथील बाजारात भक्तांची झुंबड उडाली आहे. प्रति नग अगदी ४० रुपये ते ४५० रुपयांपर्यंत अडीच ते तीन फुटांपर्यंत आकर्षक कंठीहार बाजारात उपलब्ध आहेत.मुंबईत गणेशोत्सवाचे दिवस जवळ आले की बाजारपेठेत कंठीहारांच्या विविध व्हरायटी उपलब्ध होतात.

यंदाही आकर्षक डिझाईनमधील कंठीहार भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. गणपतीच्या अलंकरणात कंठीहार हा शुभतेचे प्रतीक असून भक्ती, श्रद्धा व समृद्धी यांचे द्योतक मानले जाते. या हारात मणी, रुद्राक्ष, मोती, सोनसाखळी किंवा कृत्रिम मोत्यांच्या माळा यांचा समावेश असतो. कंठी हाराचे महत्त्व धार्मिक दृष्टिकोनातून फार मोठे मानले जाते.

मुंबईतील दादर, परळ, लालबाग, भुलेश्वर येथील बाजारपेठांत गणेशोत्सवासाठी खास कंठी हार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पारंपरिक मणीमाळा, कृत्रिम दागिन्यांचे सेट, सोन्याच्या व चांदीच्या माळा तसेच हाताने तयार केलेल्या कंठी हारांना विशेष पसंती दिली जाते. काही भक्त आपल्या गणेश मूर्तीसाठी नावीण्यपूर्ण डिझाईन्सची माळ खास बनवून घेतात, असे महेश ज्वेलर्स या दुकानातील कामगारांनी सांगितले.

मार्केटमधील दर (कंठीहारांची किंमत, गुणवत्तेनुसार व डिझाईननुसार बदलते)

साधे कृत्रिम कंठी हार : ५० ते १५० रुपये

मोती व मणींचे हार : २०० ते ५०० रुपये

रुद्राक्ष व खास डिझाईनचे हार : ५०० ते १५०० रुपये

चांदीच्या माळा : २००० ते ५००० रुपये

बाप्पाच्या कानात घालण्यासाठी बुगडी : १५० रुपये जोडी

logo
marathi.freepressjournal.in