
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते खोदल्यास पालिकेकडून प्रतिखड्डा १५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार होता. मात्र, आकारण्यात येणाऱ्या प्रस्तावित दंडाच्या (रस्ते पुनर्स्थापना शुल्क) रकमेत कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले. यानंतर, पालिकेकडून खड्ड्यांवरील वाढीव दंड अखेर मागे घेण्यात आला आहे. यापूर्वी, हा दंड रद्द करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भाजपकडून करण्यात आली होती.
मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास नव्या नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी १५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. आतापर्यंत प्रति खड्डा २ हजार रुपये दंड आकारण्यात येत असताना, त्यात अचानक मोठी वाढ केल्यामुळे गणेश मंडळामध्ये नाराजी पसरली होती. याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने वाढीव दंड रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच अनेक राजकीय पक्षांनी हा दंड जाचक असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
प्रतिखड्डा २ हजार रुपयेच दंड
गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीसाठी नव्या नियमावलीनुसार प्रति खड्डा १५ हजारांचा दंड आकारण्यात येणार होता. मात्र, आता जुन्या नियमांनुसार प्रतिखड्डा केवळ २००० रुपये आकारण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.