
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असून बाप्पाच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. घराघरात असो वा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सजावटीसाठी सध्या भक्तांची लगबग सुरू आहे. गणेशमूर्तीला आगळी सजावट करताना फुलांची सजावट नेहमीच आकर्षण ठरते. यंदाच्या गणेशोत्सवात कापडी फुले, माळ, जास्वंदीची पाने, चिनी बनावटीच्या फुलांना मोठी मागणी आहे.
गणेशोत्सव जवळ आला की, बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य विक्रीस येते. यंदा विशेषतः मुंबईत कृत्रिम फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. पारंपरिक ताज्या फुलांच्या माळा, तोरणे आणि सजावटीच्या वस्तूंच्या जोडीने आता कृत्रिम फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यंदा पावसामुळे नैसर्गिक फुलांच्या शेतीला फटका बसल्याने बाजारात नैसर्गिक फुलांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे घरगुती गणेशमूर्ती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात कृत्रिम फुलांच्या वापराला यंदा पसंती देण्यात येत आहे. ताजी फुले काही तासांत कोमेजतात, परंतु कृत्रिम फुले संपूर्ण उत्सव काळात ताजीतवानी तर दिसतातच, पण एकदा खरेदी केल्यानंतर पुढील वर्षीही त्यांचा पुनर्वापर करता येतो.
क्रॉफर्ड मार्केट, लालबाग, दादर, परळ आदी बाजारपेठांमध्ये विविध रंगीबेरंगी कृत्रिम फुलांच्या माळा, हार, तोरणे उपलब्ध आहेत. पाश्चात्य शैलीतील गुलाब, ट्युलिप, ऑर्किड्स यासोबत पारंपरिक झेंडू, मोगरा आदी फुलांना मोठी मागणी असून ३० रुपये डझन ते चिनी बनावटीची फायकत पती ६०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत, असे ‘न्यू भारत ट्रेंड्स’ या दुकानातील कर्मचाऱ्यांनी दैनिक ‘नवशक्ति'शी बोलताना सांगितले.
एकंदरीत पर्यावरणपूरक व टिकाऊ सजावट साहित्याची आवड वाढत असल्याने यावर्षी मुंबईतील गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा रंग अधिकच खुलताना दिसत आहे.
...म्हणून कृत्रिम फुलांचा पर्याय उपयुक्त!
कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या विक्रीवर परिणाम होतो. मात्र, उत्सव काळात खरेदीसाठी होणारी गर्दी, वाहतूक व फुलांची देखभाल यांचा विचार करता कृत्रिम फुलांचा पर्याय अधिक उपयुक्त ठरतो, असे नाशिक येथील गणेशभक्त गणेश पाटील यांनी सांगितले.
कृत्रिम फुलांचे दर
कपड्याची माळ - २५० ते ३५० रुपये जोडी
फायकस पती - ६०० रुपये
चिनी बनावटीची फुले - ३० रुपये डझन
घरगुती सजावटीसाठी दर्शनीय फुलांचा सेट - ८०० रुपये