‘गारगाई’ची गंगा मुंबईच्या अंगणी; मुंबईला मिळणार आणखी ४०० दशलक्ष लिटर पाणी

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला आणखी ४०९ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आखलेल्या गारगाई प्रकल्पाच्या प्रगतीचे पुढचे पाऊल पडले असून गारगाईची गंगा मुंबईच्या अंगणी अवतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

शिरीष पवार

मुंबई : मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला आणखी ४०९ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आखलेल्या गारगाई प्रकल्पाच्या प्रगतीचे पुढचे पाऊल पडले असून गारगाईची गंगा मुंबईच्या अंगणी अवतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणार असलेल्या झाडांच्या गणनेचे काम हाती घेतले जाणार आहे.

नियोजित गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये ६९ मीटर उंचीचे, ९७२ मीटर लांबीचे धरण बांधणे, मनोऱ्याचे बांधकाम, गारगाई ते मोडकसागर जलाशयाच्या दरम्यान अंदाजे २.० किमी लांबीच्या बोगद्याचे काम नियोजित आहे. या प्रकल्पामुळे येथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. यासाठी येथील झाडे हटवावी लागणार आहेत. प्रकल्प पूर्ण करताना येणाऱ्या पर्यावरणाच्या अडचणी दूर करण्यासाठीही अभ्यास केला जाणार आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईकरांची पाण्याची मागणी वाढते आहे. सध्या मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची कमतरता भासते आहे. दररोजच्या

पाणीपुरवठ्यातील असलेली तूट भरून काढण्यासाठी पालिकेचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. परवानग्या आणि इतर काही समस्यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. आता सरकारची आवश्यक परवानगी मिळाली आहे. बाधित होणारी शेतजमीन लक्षात घेता येथील चार गावांतील रहिवाशांच्या या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून पुनर्वसनाचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पाचा आता वेग घेणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मुंबईचा पाणीपुरवठा वाढवण्याच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारने नेमलेल्या डॉ. एम. ए. चितळे समितीने शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. मात्र मनोर येथे समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पामुळे गारगाई पिंजाळ धरण प्रकल्प बाजूला पडला होता. पालिकेने आता पुन्हा एकदा या प्रकल्पाला गती देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in