एजाज लकडावाला याला जन्मठेप, छोटा राजनची निर्दोष सुटका
मुंबई : २८ वर्षांपूर्वी टोळीयुद्धातून व्यावसायिकाच्या झालेल्या हत्या प्रकरणात छोटा राजन टोळीतील गँगस्टर एजाज लकडावाला याला सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत त्याला अतिरिक्त पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. याच गुन्ह्यातील सहआरोपी छोटा राजन याची मात्र सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आशिष पाटील यांनी या खटल्याचा निकाल गुरुवारी जाहीर केला.
७ ऑक्टोबर १९९६ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास व्यावसायिक सय्यद फरीद मकबुल हुसैनवर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. मोहम्मद अली रोडवरील हुसैनच्या दुकानात गोळीबाराची घटना घडली. हल्लेखोरांनी गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला होता. हुसैनला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता.
हुसैनचा लहान भाऊ छोटा शकीलचा जवळचा सहकारी होता. तो १९९३ च्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांचा हुसैनच्या भावाला संपवण्याचा कट होता. मात्र ओळख पटवण्यात चूक झाल्याने हल्लेखोरांनी हुसैनवर गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी भक्कम साक्षी-पुरावे सादर केले. ४ ऑक्टोबर २०२२ रोजी या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली.
सरकारी पक्षाने एकूण १३ साक्षीदार तपासले. हुसैनचा भाऊ सय्यद सोहेल मकबुल हुसैनसह तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष खटल्यात निर्णायक ठरली. तसेच हुसैनने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबानीत, गोळीबार करणाऱ्याने ‘नाना’ (छोटा राजन) हे नाव घेतले होते, असे सांगितले होते. त्यावरून हत्येमागे छोटा राजनचा हात असल्याचा संशय बळावला होता.