

मुंबई : गणेशोत्सवासाठी आकर्षक रोषणाई, डेकोरेशनचे साहित्य खरेदी करण्याकरिता विविध बाजारपेठांमध्ये भक्तांची झुंबड उडाली आहे. रोषणाई आणि सजावटीमधील बहुतांश साहित्य चिनी बनावटीचे असल्याने यंदाही गणपती सजावटीला 'चिनी' मालाचा झगमगाट पाहण्यास मिळणार आहे. धारावी, भिवंडीतील कारख्यान्यांमध्ये तयार झालेल्या प्लास्टिक फुलांनाही देखील ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे.
मुंबईतील घाऊक बाजारपेठा
सजावटीच्या साहित्याने फुलू लागल्या आहेत. रंगीबेरंगी एलईडी माळा, कृत्रिम फुले, चमकदार तोरणे, सजावटीचे पडदे, आकर्षक लाइटिंग आणि विविध थीमवरील साहित्य बाजारपेठांमध्ये दिसू लागले आहे. क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ, अब्दुल रहमान स्ट्रीट आणि भुलेश्वर परिसरातील घाऊक बाजारांमध्ये किरकोळ विक्रेते, घरगुती गणपती बसविणारे भाविक तसेच सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते सजावटीच्या खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत.
या बाजारपेठांमध्ये सजावटीचे साहित्य, तोरणे, कृत्रिम फुले आणि विविध उत्सवी वस्तू घाऊक घरात उपलब्ध आहेत. मात्र यामध्ये चिनी बनावटीच्या मालाचाच अधिक बोलबाला आहे.
एलईडी दिव्यांच्या माळा, चमकदार पडदे, कृत्रिम फुलांच्या माळा आणि तयार सजावटीच्या चिनी मालाला अधिक उठाव आहे. या वस्तू स्वस्त आणि आकर्षक असल्याने ग्राहक त्याकडे अधिक वळतात. तर भारतीय बनावटीच्या वस्तू या महाग असल्याने त्या अधिक विकल्या जात नसल्याचे, पायोनिर इलेक्ट्रिकचे मालक चंद्रकांत वणारे यांनी सांगितले.
५० रुपयांच्या माळा
रोषणाईचे बल्ब, विविध रंगांमधील माळा, झुंबर असे विविध आकार आणि डिझाइनचे साहित्य कमी किमतीपासून उपलब्ध आहे. सजावटीचे लहान लहान साहित्य ५ रुपये पासून येथे उपलब्ध होते. रोषणाईच्या विविध रंगातील माळा ५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. हे सर्व साहित्य चिनी बनावटीचे आहे. तर याच सारखे भारतीय बनावटीचे साहित्य २०० ते ५०० रुपयांपासून सुरु होत असल्याने ग्राहकांचा कल कमी किमतीकडे आणि आकर्षक वस्तूंकडे आहे.
मेड इन धारावी
कृत्रिम फुले, माळा, सुट्टी प्लास्टिकची फुले अशा विविध वस्तू या धारावी आणि भिवंडीतील कारखान्यात तयार होतात. या फुलांना यंदा चांगली मागणी दिसत आहे. काही साहित्य हे चिनी बनावटीचे असले तरी सजावटीमध्ये भारतीय वस्तूंही उपलब्ध असल्याचे, भुलेश्वरमधील ओम क्रिएशनचे चालक मितेश पांढरे यांनी सांगितले.
अॅक्वा मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मैट्रो-३ मार्ग अर्थात अॅक्वा लाईनची सेवा गणेशोत्सवाच्या काळात १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच दीड फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तीसह मेट्रो प्रवासाचीही सुविधाही एमएमआरसीने उपलब्ध करून दिली आहे. सध्या कफ परेड आणि आरे जेव्हीएलआर या दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून शेवटची मेट्रो १०.३० वाजता आहे.