

मुंबई : वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईची तहान भागवण्यासाठी गारगाई धरणातून अतिरिक्त ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरणविषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंजुरी दिली.
मुंबईतील वाढत्या लोकसंख्येसाठी गारगाई प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी ८४४.८७९ हेक्टर जमीन वळतीकरण प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने मुंबईकरांना अतिरिक्त पिण्याचे पाणी मिळणार आहे. गारगाई धरणाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी वन विभागाने वन्यजीव व पर्यावरणविषयक परवाने अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून द्यावेत. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे त्रुटीविरहित प्रस्ताव सादर करून तातडीने वन्यजीव व पर्यावरणविषयक मंजुरी घ्यावी, जेणेकरून गारगाई धरणाच्या कामास गती येईल, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
संरक्षित क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्र व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांचे राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने शिफारस केलेले प्रस्ताव मार्गी लावण्यासंदर्भातही या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. केंद्र शासनाच्या परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करावेत. या व्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी सहमतीने संपादित कराव्यात. पायाभूत सुविधा, प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या वन जमिनीच्या बदल्यात व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारील व्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी स्वेच्छेने संपादित करून वनीकरणासाठी घेण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची २४ वी बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान मुख्य वन संरक्षक(वन बल) शोमिता बिश्वास, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव उपस्थित होते.
पक्षी अभयारण्याच्या क्षेत्रात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प
चांदोली राष्ट्रीय उद्यानातील जनाईवाडी येथील गावकऱ्यांच्या सात-बारावरील वन विभागाचे संपादन शेरे कमी करणे, जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रात तरंगत्या सौर उर्जा प्रकल्पासाठी मान्यता यासह इतर महत्वाच्या प्रस्तावांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली.