

मुंबई : गारगाई धरण प्रकल्पाला स्थायी समिती व सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर आता प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. गारगाई धरण प्रकल्पात कुठलीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ८ तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. धरणाची डिझाईन, सहा गावांचे पुनर्वसन, ३ लाखांहून अधिक झाडांचे पुनर्रोपण, धरणाची सुरक्षा या गोष्टीत तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जपान, नेदरलँड्स, स्पेन या पाच विदेशी कंपन्यांसह भारतातील तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून यापैकी ज्या कंपनीकडे तज्ज्ञांची टीम असेल त्या कंपनीची निवड करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, भविष्यात पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी गारगाई धरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. गारगाईतून मुंबईला ४४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. मुंबईला अतिरिक्त पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी गारगाई प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ५ हजार ३९६ कोटी रुपये आहे.
या प्रकल्पात सहा गावे बाधित होणार असून त्या गावांचे वाडा तालुक्यातील देवळी गावात ३३४ हेक्टर जमिनीवर पुनर्वसन करण्यात येणार आहे, तर तीन लाख झाडे तानसा धरणाजवळ ५ किलोमीटर अंतरावर पुनर्रोपित करण्यात येणार आर्त. बाधित कुटुंबांना १० ते १२ लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे. बाधित कुटुंबांतील एका सदस्याला पालिकेत नोकरी देण्यात येणार आहे.
चार गावांत सोयीसुविधा
गारगाई धरण प्रकल्पात बाधित होणाऱ्या चार गावांचे पुनर्वसन करताना त्या परिसरात शाळा, रस्ते, पाणी, वीजपुरवठा, रुग्णालय, दवाखाना, ग्रामपंचायत, मंदिर अशा सुविधा उपलब्ध होणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
या कामातील तज्ज्ञांची निवड
गारगाई धरण प्रकल्पात झाडांचे पुनर्रोपण, सहा गावांचे पुनर्वसन, धरणाची डिझाईन, फारेस्ट तज्ज्ञ, दोन हजार लोकांची सेफ्टी, शेतीविषयक तज्ज्ञ.
अनुभव बंधनकारक
धरण केल्याचा अनुभव, टनेल केल्याचा अनुभव
या विदेशी कंपन्यांचा प्रतिसाद : स्पेन, जपान, नेदरलँड्स, इटली
भारतीय कंपन्या : टाटा, स्पेक्ट्रम