गारगाई धरणाच्या कामाचा शुभारंभ ऑक्टोबरमध्ये; २०२९ च्या पावसाळ्यात धरण तुडुंब भरणार; मुंबईला ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार

मुंबईची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी गारगाई प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ ऑक्टोबर मध्ये होणार असून २०२९ च्या पावसाळ्यात हे धरण तुडूंब भरणार, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी गारगाई प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ ऑक्टोबर मध्ये होणार असून २०२९ च्या पावसाळ्यात हे धरण तुडूंब भरणार, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

गारगाई धरणातून मुंबईला ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, गारगाई धरण प्रकल्पासाठी ६५७ हेक्टर जमीन संपादन करण्यात आली असून धरण क्षेत्रातच ३ लाख झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती अभिजीत बांगर यांनी दिली. दरम्यान, प्रकल्पासाठी लागणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन महत्त्वाच्या परवानग्या जुलैपर्यंत मिळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मुंबईला २०४१ मध्ये ६ हजार ४०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. गारगाई धरण प्रकल्पाची चर्चा गेली १२ वर्षे सुरू आहे, असे स्थायी समिती सदस्या डॉ. सईदा खान म्हणाल्या. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, गारगाई प्रकल्प तसेच समुद्राचे खारे पाणी गोडे करणे असे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, असे बांगर यांनी स्थायी समितीत स्पष्ट केले.

बाधित चार गावांचे देवळी गावात पुनर्वसन

गारगाई धरण प्रकल्पात चार गावे बाधित होणार असून त्या गावांचे वाडा तालुक्यातील देवळी गावत ४०० हेक्टर जमिनीवर पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर तीन लाख झाडे धरणाजवळ ५ किलोमीटर अंतरावर पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत चंद्रपूर, हिंगोली, वाशिम जिल्ह्यात ६५८ हेक्टर जमिनीवर नवीन झाडे लावली जाणार आहेत. हा गारगाई धरण प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in