गारगाई प्रकल्प आता तहान भागविणार! आयआयटी मुंबई करणार अभ्यास, मुंबईला ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार

गारगाई प्रकल्पात पाच लाखांहून अधिक झाडांचा बळी जाऊ नये यासाठी झाडांचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईची निवड करण्यात आली आहे.
गारगाई प्रकल्प आता तहान भागविणार! आयआयटी मुंबई करणार अभ्यास, मुंबईला ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार

मुंबई : गारगाई प्रकल्पात पाच लाखांहून अधिक झाडांचा बळी जाऊ नये यासाठी झाडांचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे थंडबस्त्यात गेलेला गारगाई प्रकल्प राबवण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा हालचाल सुरू केली आहे. गारगाई प्रकल्पाचा आयआयटी मुंबई अभ्यास करणार असून संस्थेला ३० लाख रुपये पालिका मोजणार आहे. दरम्यान, प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होईल, असे जल विभागाकडून सांगण्यात आले.

मोडक सागर मध्य वैतरणा अप्पर वैतरणा भातसा तानसा विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली असून वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार मुंबई महानगर पालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्प प्राध्यान्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले होते; मात्र मनोरी येथे समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पामुळे गारगाई पिंजाळ धरण प्रकल्प बाजूला पडल्याचे निश्चित होते; मात्र आता पुन्हा एकदा या प्रकल्पासाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू आहेत.

'असा' साकारणार प्रकल्प

नियोजित गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये ६९ मीटर उंचीचे, ९७२ मीटर लांबीचे धरण बांधणे, आदान मनोर्‍याचे बांधकाम, गारगाई ते मोडकसागर जलाशयाच्या दरम्यान अंदाजे २.० किमी लांबीच्या बोगद्याचे काम नियोजित आहे. गारगाई जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर धरणात आणून गुरुत्वीय पद्धतीने मुंबईला पुरवण्याचे प्रस्तावित. या प्रकल्पामुळे ६१९ कुटुंबाचे पुनर्वसन करावे लागणार असून, सुमारे पाच लाख झाडे हटवावी लागणार .

याचा अभ्यास करणार

  • उपलब्ध अहवालांनुसार पर्यावरणावर होणारे परिणाम

  • प्रकल्पामुळे किती झाडे बाधित होतील

  • झाडे कापल्यास पर्यावरणाची हानी कशी भरून काढणार

  • बुडित क्षेत्रावर होणारे परिणाम, उपाय

  • मुंबईच्या पाणीपुरवठ्यात वाढ झाल्याने होणारे फायदे

  • पर्यावरण रक्षणासाठी अतिरिक्त उपाय सुचवणे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in