Mumbai : 'गरीबनगर'चा बदला घेण्यासाठी हल्ल्याचा कट?

वांद्रे येथील गरीबनगर भागात रेल्वेच्या जागेवर झालेली अनधिकृत बांधकामे आणि धार्मिक स्थळ हटवण्याच्या कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशतवादी हल्ला घ़डवण्याचा कट रचला जात होता, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
Mumbai : 'गरीबनगर'चा बदला घेण्यासाठी हल्ल्याचा कट?
Mumbai : 'गरीबनगर'चा बदला घेण्यासाठी हल्ल्याचा कट?
Published on

मुंबई : वांद्रे येथील गरीबनगर भागात रेल्वेच्या जागेवर झालेली अनधिकृत बांधकामे आणि धार्मिक स्थळ हटवण्याच्या कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशतवादी हल्ला घ़डवण्याचा कट रचला जात होता, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी ८ जणांना अटक केली असून, त्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी तीन जण हे मुंबई आणि उपनगरातील रहिवासी असल्याचे समजते.

गरीबनगरमधील अनधिकृत बांधकामे पाडल्यानंतर काही कट्टरपंथी घटक सक्रिय झाले होते. आरोपींनी या परिसराची पाहणी केली होती आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेची माहिती गोळा केली होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे. ही संशयित हालचाल केवळ पाळत ठेवण्यासाठी होती की मोठ्या हल्ल्याची तयारी होती, याचा तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात आहे. अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये गरीबनगर परिसराचे फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. यामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आणि गर्दीच्या ठिकाणांचे फुटेज असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानी कनेक्शन?

तपासादरम्यान, मुंबईतील काही संशयितांचा पाकिस्तानस्थित हँडलर्सशी संपर्क असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. डिजिटल पुराव्यांची आणि व्हॉईस नोट्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. तसेच, या प्रकरणात पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी, यावर खान आणि काही अंडरवर्ल्ड कनेक्शनचा संदर्भही समोर आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in