मुंबई : गेले काही महिने देशात खाद्यपदार्थांचे दर वाढत आहेत. टोमॅटोचे दर वाढल्याने सर्वसामान्य माणसांच्या तोंडचे पाणी पळाले. ते कमी होऊ लागल्यानंतर कांदा महाग झाला, आता लसणाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. लसूण ४०० रुपये किलोवर गेला आहे.
दरवर्षी डिसेंबरमध्ये लसण्याच्या किमती वाढत असतात. मात्र, यंदा लसणाच्या दरातील वाढ ही असामान्य आहे. गेल्या सहा आठवड्यांत लसणाचे दर दुप्पट झाले आहेत. लसणाचा पुरवठा कमी झाल्याने ही दरवाढ झाली. मध्य प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्रात लसणाचे उत्पादन होते.
कांदा व टोमॅटोच्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे किचनचे बजेट वाढले. काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर २०० रुपये किलोवर पोहोचले होते. त्यानंतर सरकारने स्वस्तात टोमॅटो विक्री सुरू केली. आता टोमॅटोचे दर कमी झाल्यानंतर कांद्याचे दर ७० रुपये किलोवर गेले आहेत. आता सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.