महाड MIDC तील कंपनीत वायू गळती; एका कामगाराचा मृत्यू

कंपनीत वायू गळती झाल्याचे समजताच ग्रामस्थ आक्रमक झाले आणि कंपनीची तोडफोड केली
महाड MIDC तील कंपनीत वायू गळती; एका कामगाराचा मृत्यू
Published on

महाराष्ट्रातील महाड एमआयडीसीतील एका कंपनीत भीषण अपघात झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली असून यामध्ये एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे, तर २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दोन कर्मचाऱ्यांना उपचारासाठी देशमुख रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील प्रसोल कंपनीत विषारी वायूची गळती झाली आहे. या विषारी वायूच्या गळतीमुळे वळण येथील जितेंद्र आडे (४० वर्ष) यांचा मृत्यू झाला. आडे हे कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करायचे. यापूर्वी कोकणातील खेड लोटे एमआयडीसीमध्ये अशाच दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली होती.

गॅस गळतीमुळे कंपनीचे स्टोअर इन्चार्ज प्रशांत किंकळे आणि मिलिंद मोरे या दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. वेळीच उपचार मिळाल्याने दोघांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राथमिक तपासात अपघाताचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.या घटनेवर पोलीस आणि जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. तहसीलदार सुरेश काशीद यांनी कंपनीला भेट दिली आहे. दरम्यान, तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे या घटनेनंतर एमआयडीसीत काम करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in