गेट वे ते डोंबिवली ६५ कि. मी.ची दौड; रनर्स क्लॅन फाऊंडेशन च्या वतीने आयोजन

या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गेट वे ते डोंबिवली ६५ कि. मी.ची दौड;
रनर्स  क्लॅन फाऊंडेशन च्या वतीने आयोजन

डोंबिवली : रनर्स क्लॅन फाऊंडेशन च्या वतीने आयोजित  एक दौड वीर जवानोंके लिये या गेट वे ते डोंबिवली अशा ६५ कि. मी. रन चे उद्घाटन सावळाराम महाराज क्रिडा संकुल, डोंबिवली येथे सहा. पोलीस उपायुक्त सुनिल कुराडे यांच्या हस्ते रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वा. मोठया उत्साहात पार पडले. यावेळी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, वाशिंद, विक्रोळी, ठाणे, नवी मुंबई, मुंबई इ. ठिकाणावरून मोठया प्रमाणात धावपटू सहभागी झाले होते. याप्रसंगी रनर्स क्लॅन फाऊंडेशनच्या वतीने समाजातील होतकरू आणि गरजु विद्यार्थ्यांना संरक्षण दल, निमलष्करी दले, पोलीस दल, इ. स्पर्धा परीक्षाची तयारी करण्याकरिता पुस्तकांचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

 रनर्स क्लॅन संस्था ही काही हौशी रनर्सनी साधारण सहा वर्षांपुर्वी सुरू केली. सुरवात केली तेव्हा साधारण आठ-दहा जणांची ही संस्था आज २५० च्या वर सुदृढ कुटुंबांची बनली आहे. आजपर्यंत या संस्थेने २०१९ रोजी झालेल्या कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना तसेच २०२० रोजी झालेल्या चिपळूण येथील पुरग्रस्तांना आर्थिक स्वरूपात आणि वस्तू स्वरूपात मदत केली. तसेच कोविड काळात जनजागृतीसाठी डोंबिवली येथे रन घेण्यात आली. सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या जनजागृतीसाठीही रन आयोजित केली होती. कुटुंबातील कौटुंबिक जिव्हाळा वाढत रहावा यासाठी आपल्या सदस्यांसाठी रनर्स क्लॅन संस्था फॅमिली रनही आयोजित करीत असतात. गेल्या तीन वर्षांत देशभरातील स्पर्धात्मक खेळांमध्ये रनर्स क्लॅनच्या धावपटुंनी १५० पेक्षा जास्त सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली आहे. देशाचे राष्ट्रीय सण म्हणजे १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी सकाळी संस्थेच्या वतीने प्रभातफेरी आयोजित केली जाते. त्यात ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होणारी विशेष दौड म्हणजे गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली अशी ६५ किमीची अल्ट्रा मॅरेथॉन दौड असते. ही दौड ३ फेब्रुवारीला बरोबर रात्री १२ च्या ठोक्याला सुरू होईल व ४ फेब्रुवारीला सकाळी ८ ते ८:३० दरम्यान डोंबिवली येथे पोहोचेल. संस्थेचे ही दौड आयोजित करण्याचे चौथे वर्षे आहे.

या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात या अल्ट्रा दौडचे डायरेक्टर के. हरिदासन, कोच - रनटॅस्टीक दिल से ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, ग्लोब डेव्हलपर्सचे माधव सिंग आणि द पॅसिफिकचे निखिल दुधे हे उपस्थित होते. रनर्स क्लॅन फाऊंडेशनचे मुख्य विश्वस्त लक्ष्मण गुंडप, मुकुंद कुलथे, विजय सकपाळ, ईश्वर पाटील, विजय पाटील, गिरीश लोखंडे, डॉ. अविनाश भिंगारे, महेंद्र सावंत, दिनकर पोळेकर, ॲड. रितेश वाघ,  निवृत्त सहा. पोलीस निरीक्षक  पांडुरंग घाडगे, निलेश कदम, विनोद तावडे, नितीन कुवर,  ओंकार भोईटे, तुषार महाडिक, संदीप पाटील, सूर्यकांत उपळकर इ. सदस्यांनी सदर कार्यक्रमासाठी  मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करूणा बांगर यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in