
मुंबई : ‘गेट वे’ प्रवासी बोट दुर्घटनेतील शोधमोहीम सुरूच आहे. या अपघातातील एक बालक सापडला नसल्याने शोधमोहीम सुरू असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली. दरम्यान, हा अपघात नौदलाच्या स्पीड बोटीतील तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे दुरुस्ती पथकातील कर्मचाऱ्याने स्पष्ट केल्याची माहिती नौदलाचे कमांडर आणि जनसंपर्क अधिकारी मेहुल कर्णिक यांनी दिली.
नौदलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नौदलाची स्पीड बोट ही नीलकमल या प्रवासी बोटीला आदळल्यानंतर झालेल्या अपघातात गुरुवारपर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक प्रवासी बालक सापडलेला नाही. हा अपघात नेमका कशामुळे घडला?, अपघाताची कारणे काय होती? याबाबत नौदलाने पश्चिम विभागीय नौदल क्षेत्रातील कमोडोर श्रेणीच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू केली आहे. या घटनेच्या खोलात जाऊन चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
७२ तासानंतरही शोध सुरूच
अपघाताच्या घटनेचे शोधकार्य अपघाताच्या वेळेपासून ७२ तास सुरू राहणार आहे. सध्या नौदलाची नऊ पथके आणि तटरक्षक दलाची पथके शोधकार्य करीत आहेत. या अपघातग्रस्त बोटीवरील एक प्रवासी बालक अद्यापही सापडला नसल्यामुळे हे शोध कार्य सुरूच राहणार असल्याचे कर्णिक यांनी स्पष्ट केले.
स्पीड बोटीचे स्टेअरिंंग जाम
नौदलाच्या स्पीड बोटीच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेची चाचणी घेण्यात येत होती. कार्यक्षमतेची चाचणी घेण्यासाठी इंजिन कंपनीचे चार कर्मचारीही स्पीड बोटीवर उपस्थित होते. ही स्पीड बोट वेगाने चालवून इंजिनाची तपासणी करण्यात येत होती. मात्र या दरम्यान अचानक स्पीड बोटीचे स्टेअरिंग जाम झाले. स्पीड बोटीचे स्टेअरिंग वळवता न आल्याने आणि वेगावर नियंत्रण करता न आल्याने हा अपघात झाल्याची माहिती इंजिन कंपनीच्या कर्मचाऱ्याने दिली असून तसा जबाब पोलिसांकडेही नोंदवला असल्याचे नौदलाने स्पष्ट केले.