पूनम पोळ/मुंबई
अवघ्या काही दिवसांनी लाडक्या गणरायाचे सर्वत्र आगमन होणार आहे. त्यासाठी बाजारपेठा सजल्या असतानाच गणेशभक्त दुसऱ्या बाजूला लाडक्या गौराईच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी निरनिराळ्या पद्धतीच्या गौरीची स्थापना होते. कुठे खड्याच्या, कुठे उभ्या, जेष्ठा आणि कनिष्ठा अशा विविध पद्धतीच्या गौरींचे मनोभावे स्वागत केले जाते.
यावेळी गौरीना नटवण्यासाठी, सजवण्यासाठी तिचे अस्तित्व चारही बाजूंनी प्रसन्न ठेवण्यासाठी गौरीची नेत्रदीपक आरास केली जाते. काही वर्षापूर्वी तेरड्याची मुळे गौर म्हणून पुजली जायची. मात्र, आता पूर्ण गौरी मूर्ती बसवून तिची पूजा करण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे बाजारात गणरायासोबत गौराईचे सामान घेण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड पाहायला मिळत आहे.
गौरी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी लालबाग, दादर, परळ, भुलेश्वर मार्केट, मंगलदास मार्केट याठिकाणी नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे. यावेळी बाजारात गौरी तयार करण्यासाठी लागणारे स्टँड, मुखवटा, साडी, दागिने, पाऊलजोड आणि डेकोरेशनसाठी लागणाऱ्या दिव्याचा माळा उपलब्ध आहेत. सध्या बाजारात गौरीचे विविध प्रकारचे सुंदर मुखवटे उपलब्ध आहेत. त्यामध्ये खळी मुखवटा, हसरा मुखवटा, अमरावती मुखवटा, सातारी मुखवटा, महालक्ष्मी मुखवटा आणि एकवीरा मुखवटा आदिना विशेष मागणी आहे.
हे मुखवटे लाकूड, फायबर, पीओपी, प्लास्टिकपासून तयार केले जातात. तर यातील पीओपी चंदन पेंट मुखवटा आणि वॉर्निश पेंट मुखवट्याला अधिक मागणी असून हे मुखवटे ३५० रुपयांपासून २,८०० पर्यंत मिळतात. तर शिवण लाकडापासून बनवलेल्या लाकडी मुखवट्यासह पूर्ण गौराई ही ३५ हजाराला बाजारात उपलब्ध आहे. ज्याची गॅरेंटी किमान ५० वर्षाची आहे. तर, बाजारात पीओपी, फायबर आणि प्लास्टिक मुखवटेही उपलब्ध असून यातील फायबरला अधिक मागणी असून ते जास्त काळ टिकतात. तर, प्लास्टिकमध्ये पारंपारिक पद्धत आणल्यामुळे धान्य भरणे शक्य असल्यामुळे बाजारात त्याची विशेष मागणी असल्याची माहिती दादर येथील साडीघर दुकानाचे मालक देतात.
तसेच गौरीसाठी लागणारे सुट्टे हात आणि आशीर्वाद हात यंदा हे दोन प्रकार बाजारात दिसत आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या हातांची मागणी अधिक आहे. ज्याची किंमत २५० रुपये आहे. तर गौराईला नेसवण्यात येणाऱ्या साडीमध्ये यंदा महाराणी साडीची अधिक क्रेझ आहे. या साड्या गौराईच्या उंचीनुसार मिळतात. किंवा हल्ली शिवून घेण्यांवर नागरिकांचा अधिक भर आहे. तसेच, गौराईला सजवण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे दागिनेही उपलब्ध आहेत. ज्यामध्ये ठुशी, लक्ष्मीहार, पोत्याची माळ, रत्नजडित मंगळसूत्र, कोल्हापुरी हार, बोरमाळ, तोडे, नथ हे विशेष विकले जात आहेत, अशी माहिती मिलन ज्वेलरीच्या मालकांनी दिली.
गौरी म्हणजेच पार्वतीचे रूप आणि गणपती हा गौरीचा पुत्र आहे. त्यामुळे गणपतीसोबत गौरीचे स्वागतही आपल्याकडे थाटमाटात होते. आमच्या येथे तीन वर्षानंतर गौरी पाण्यात सोडण्याची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही तीन वर्षातून एकदा गौरीसाठी लागणारे सामान खरेदी करतो. परंतु, दरवर्षी गौरीसाठी लागणाऱ्या सामानामध्ये विविधता मिळत असल्याने सामान खरेदी करताना अधिक उत्साह असल्याची प्रतिक्रिया भावना माळी या ग्राहकाने दिली.
गौरीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती
लाकडी गौरी ३५,००० रुपयांपर्यंत
फायबर गौरी २,५०० रुपयांपर्यंत
प्लास्टिक गौरी १,५०० रुपयांपासून
गौरीचे स्टँड - ५०० ते ६०० (उंचीनुसार)
मुखवटा - ३०० ते २,८०० रुपयांपर्यंत
बसणारी गौरी - १५,५०० पर्यंत
उभी गौरी - ७,५०० ते १६,५०० पर्यंत
साडी - ७५० रुपयांपासून ३,००० पर्यंत
दागिने - १०० रुपयांपासून १० हजारपर्यंत