ओपन जीम, मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा, होलिका दहनासाठी स्वतंत्र जागा अशा सोयीसुविधांसह दहिसर पश्चिम येथील श्री गांवदेवी उद्यान या मनोरंजन मैदानाचे लोकार्पण गुरुवारी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दहिसर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ७ मधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या प्रयत्नाने मुंबई महानगरपालिकेचे श्री गांवदेवी उद्यान या मनोरंजन मैदानाचे दहिसरवासीयांसाठी खुले झाले आहे. ३५६८ चौ. मी क्षेत्रफळाचे हे उद्यान असून कम्युनिटी पार्क अशी याची थीम आहे. छतासह बसण्याची सुविधा, मुलांना खेळण्याचे क्षेत्र, खुले व्यायाम क्षेत्र, लॉन क्षेत्र तसेच स्थानिक गावकऱ्यांच्या मागणीनुसार होलिका दहन करण्यासाठी स्वतंत्र क्षेत्रही या उद्यानात ठेवण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून या उद्यानाचे काम सुरू होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या उद्यानाचे काम अतिशय संथ गतीने सुरू होते. पण शिंदे फडणवीस सरकारच्या काळात या कामाला गती आली. नागरिकांसाठी हे उद्यान खुले होत असल्याचा आनंद होतोय, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या.
या कार्यक्रमप्रसंगी स्थानिक आमदार मनिषा चौधरी, विभागप्रमुख- आमदार प्रकाश सुर्वे, नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर, उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे आणि मान्यवर उपस्थित होते.