मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अवमान आम्ही कदापी सहन करणार नाही. देशभरात केंद्रीय मंत्री शहा यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन होत आहे. त्यामुळे मोदींनी गृहमंत्र्यांना पाठीशी न घालता चार दिवसांत राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात गुरुवारी फोर्ट येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ वंचीत बहुजन विकास आघाडीने जोरदार आंदोलन केले. यावेळी भाजप, अमित शहांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला.
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बुधवारी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. वंचित बहुजन विकास आघाडीने ठिकठिकाणी आंदोलन करत अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंबईतही वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.