होर्डिंगवरून तू तू-मैं मैं; बेजबाबदारपणाचे १४ बळी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू

घाटकोपर छेडा नगर येथे बेकायदा महाकाय होडिॅग पेट्रोल पंपावर सोमवारी सायंकाळी कोसळले आणि या दुर्घटनेत १४ निष्पाप लोकांचा जीव गेला.
होर्डिंगवरून तू तू-मैं मैं; बेजबाबदारपणाचे १४ बळी   राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू

मुंबई : घाटकोपर छेडा नगर येथे बेकायदा महाकाय होडिॅग पेट्रोल पंपावर सोमवारी सायंकाळी कोसळले आणि या दुर्घटनेत १४ निष्पाप लोकांचा जीव गेला. या दुर्घटनेवरून रेल्वे व पालिकेमध्ये तू तू - मै मै सुरू झाले असताना दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. त्यामुळे निष्पाप लोकांच्या मृत्यूस जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, कोसळलेले महाकाय होर्डिंग हटवण्याचे काम सुरू असून बुधवारी सकाळपर्यंत हटवण्यात ते येईल. महाकाय होर्डिंग हटवण्याचा खर्च संबंधित कंपनीकडून वसूल करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.

सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा मुंबईला बसला. वादळी वाऱ्यासह पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. घाटकोपर छेडा नगर येथे बेकायदा महाकाय होडिॅग कोसळले. या दुर्घटनेत एकूण ८८ जण जखमी झाले, त्यापैकी १४ जण दगावले. तर ४२ जखमींना उपचारासाठी राजावाडी, केईएम, विक्रोळीतील एम जे रुग्णालय, एचबीटी रुग्णालय व कळवा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ३२ लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. घटनास्थळी पालिकेचे अधिकारी उपस्थित असून प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

हायड्रोलिक व प्लाझ्मा कटरचा वापर

महाकाय होर्डिग छेडा नगर येथील पेट्रोल पंपावर कोसळल्यानंतर पेट्रोल पंपात किती पेट्रोलचा साठा कुठे आहे याची माहिती सोमवारी रात्री बीपीटीच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. त्यानंतर सावधगिरी बाळगत पेट्रोल पंपावर पडलेले महाकाय होर्डिंग हळुवारपणे कापण्यात येत आहे. यासाठी हायड्रोलिक कटरचा वापर करण्यात येत असून हायड्रोलिक व प्लाझ्मा कटरमुळे आगीची ठिणगी उडत नाही. त्यामुळे याचा वापर करण्यात येत आहे.

तीनही बेकायदा होर्डिंग हटवण्याचे काम सुरू

छेडा नगर दुर्घटना घडलेल्या भागातच आणखी तीन महाकाय होर्डिंग बेकायदेशीरपणे उभारण्यात आले होते. हे होर्डिंगही पालिकेने हटवण्यास सुरुवात केली असून बुधवारी संध्याकाळपर्यंत तिन्ही होर्डिंग हटवण्याचे काम पूर्ण होईल.

बेस्ट, एमएमआरडीएकडून होर्डिंगची यादी मागवली

दरम्यान, या घटनेनंतर बेस्ट उपक्रम, एमएमआरडीए , बीपीटी, एमएसआरडीसी अशा विविध प्राधिकरणांकडून त्यांनी लावलेल्या होर्डिंगची यादी मागवण्यात आली असून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.

बेकायदा होर्डिंग हटवा - आयुक्त

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. मुंबईच्या सर्व वॉर्डमधील होर्डिंगचा आढावा घेऊन धोकादायक होर्डिंग हटवण्याचे आदेश सहायक आयुक्तांना दिल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सर्व बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. घाटकोपर दुर्घटनास्थळी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली तसेच घटनास्थळावरील परिस्थितीचा देखील आढावा घेतला.

होर्डिंग प्रकरणाची ‘जीआरपी’कडून चौकशी सुरू

होर्डिंग्ज कोसळून घाटकोपरला झालेल्या अपघाताची रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) चौकशी सुरू केली आहे. हा कोसळलेला बोर्ड लावायला जीआरपीने २०२१ मध्ये परवानगी दिली होती. रेल्वेचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी ही परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. आता या प्रकरणाची जीआरपीकडून चौकशी सुरू आहे.

भावेश भिंडे फरार, अटकेसाठी दोन विशेष पथकांची नियुक्ती

होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिसांनी युगो कंपनीचा मालक भावेश भिंडेसह कंपनीचे संचालक, अधिकारी, शासकीय कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे. भावेश भिंडेसह इतर आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी दोन विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. घरासह कार्यालयात छापा टाकल्यानंतर भावेश हा पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याच्यावर २३ फौजदारी गुन्हे दाखल असून बलात्काराच्या आरोपावरून त्याला अलीकडेच अटकही झाली होती.

तत्कालीन पोलीस आयुक्तांनी दिली परवानगी - लोहमार्ग पोलीस

लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या कल्याण निधी संस्थेमार्फत घाटकोपरमध्ये पेट्रोल पंप चालविण्यात येत होता. या पेट्रोल पंपाशेजारी तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या मंजुरीनंतर येथे जाहिरात कंपनीस भाडेतत्त्वावर १० वर्षाच्या कालावधीसाठी जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली होती, असे लोहमार्ग पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, हे होर्डिंग काढून टाकण्यासाठी गेल्या आठवड्यात महापालिकेने लोहमार्ग पोलीस आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार मनपाने हे होर्डिंग काढून टाकण्याचे पत्र लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाला पाठवले होते. रेल्वेने हे होर्डिंग काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

दुर्घटनेतील मृतांची नावे

पुर्निश जाधव (५०), दिलीप पासवान (३४) बशीर अहमद (५२), फहीम खलील खान (२२), हंसनाथ गुप्ता (७१), सतीश सिंह (५२), चंद्रमणी प्रजापती (४५), मोहम्मद अक्रम (४८), भारत राठोड (२४), दिनेशकुमार जैस्वाल (४४), सचिन यादव (२३) अशी मृतांची नावे आहेत. तर शीव रुग्णालयात एका निनावी पुरुषाची ओळख पटली नसून राजावाडी रुग्णालयात एक २५ वर्षे व एका ५२ वर्षीय मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in