होर्डिंगचा पाया मजबूत होता का? व्हीजेटीआय करणार ऑडिट; स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचा पालिकेचा आदेश

घाटकोपर, छेडा नगर येथील दुर्घटनाग्रस्त बेकायदा होर्डिंगचा पाया मजबूत होता का, याचे ऑडिट करण्यासाठी व्हीजेटीआयची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच...
होर्डिंगचा पाया मजबूत होता का? व्हीजेटीआय करणार ऑडिट; स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचा पालिकेचा आदेश
पीटीआय

गिरीश चित्रे/मुंबई

घाटकोपर, छेडा नगर येथील दुर्घटनाग्रस्त बेकायदा होर्डिंगचा पाया मजबूत होता का, याचे ऑडिट करण्यासाठी व्हीजेटीआयची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील बीपीटी व एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील होर्डिंगचा ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिल्याचे पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दैनिक 'नवशक्ति'शी बोलताना सांगितले.

वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सोमवारी मुंबईला बसला. अचानक बरसलेल्या पावसामुळे मुंबईची दाणादाण उडाली. अवकाळी पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. यात घाटकोपर, छेडा नगर येथील पेट्रोल पंपाजवळील महाकाय १२० बाय १२० बेकायदेशीर होर्डिंग सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कोसळले. या महाकाय होर्डिंगमुळे १६ निष्पाप लोकांचा बळी गेला. या दुर्घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुर्घटनाग्रस्त होर्डिंग लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जागेवर होते, हे स्पष्ट झाले आहे. या महाकाय बेकायदा होर्डिंगला पालिकेची परवानगी नव्हती. ज्या जागेवर होर्डिंग उभारण्यात आले होते, त्याठिकाणचा पाया कमकुवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुर्घटनाग्रस्त होर्डिंगचा पाया मजबूत होता का? काही त्रुटी होत्या का? या सगळ्याचे ऑडिट करण्यासाठी व्हीजेटीआयची नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले.

मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत २५० होर्डिंग असून त्यापैकी ४५ होर्डिंग ४० बाय ४० आकारापेक्षा अधिकचे आहेत. त्यामुळे हे होर्डिंग तत्काळ हटवण्यासाठी डिझास्टर ॲक्टअंतर्गत पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तर मुंबई पोर्ट ट्रस्ट व एमएसआरडीसी या दोन्ही प्राधिकरणांना त्यांच्या अखत्यारीत असलेल्या होर्डिंगचा रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिल्याचे भूषण गगराणी यांनी सांगितले.

पालिकेच्या २५ वॉर्डातील बेकायदा होर्डिंग पाडणार

घाटकोपर, छेडानगर येथील महाकाय होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबईतील बेकायदा अवाढव्य होर्डिंग लवकरच पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या २५ वॉर्डातील विनापरवाना व अवाढव्य होर्डिंगचा सर्व्हे करत ते पाडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश पालिकेच्या वॉर्ड ऑफिसरना दिल्याचे पालिका आयुक्त डॉ. गगराणी यांनी सांगितले.

होर्डिंगचे सुट्टे भाग, राडारोडा हटवला

घाटकोपर येथे होर्डिंग ज्या पेट्रोल पंपावर पडले, त्या पेट्रोल पंपात दुर्घटनेच्यावेळी ४० हजार लिटर पेट्रोल, ३० हजार किलो गॅस व ३० हजार लिटर डिझेल असे ज्वलनशील पदार्थ होते. त्यामुळे आगीचा धोका असल्याने योग्य ती खबरदारी घेत होर्डिंगचे सुट्टे भाग व राडारोडा तब्बल ५५ तासानंतर हटवण्यात यश आले. मुंबई महापालिकेसह अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक आदी यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेत दुर्घटनाग्रस्त होर्डिंग हटवले.

मृतांचा आकडा १६ वर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली आणखी दोन मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा १६ वर पोहोचला आहे, तर ७४ जण जखमी झाले आहेत.

भिंडे गुजरातमध्ये पळाल्याचा संशय

दुर्घटनाग्रस्त होर्डिंग ज्या कंपनीचे होते त्या इगो मीडिया प्रा. लि.चा मालक भावेश भिंडे याचे शेवटचे मोबाईल लोकेशन लोणावळा येथे असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्या लोणावळ्यातील पॉश रिसॉर्टवर छापा टाकला असता तो तेथून पसार झाल्याचे आढळून आले. भिंडे आता गुजरातला किंवा परदेशात पळून गेला असण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. मात्र, पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी अद्याप लुक आऊट नोटीस जारी केलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in