घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

Bhavesh Bhinde Arrested : भावेश भिंडेनं उदयनगर येथील एका हॉटेलात आपल्या भाच्याच्या नावानं रुम बुक केली होती आणि तिथं....
भावेश भिंडेला अटक
भावेश भिंडेला अटकFPJ
Published on

मुंबई: मुंबईमधील घाटकोपरमध्ये सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर मोठं होर्डिंग कोसळलं होतं. या घटनेत सुमारे १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. दरम्यान पेट्रोल पंपावर कोसळलेलं होर्डिंग बेकायदेशीर असल्याचं समोर आल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. याप्रकरणी जाहिरात एजन्सीचा मालक भावेश भिंडे याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या घटनेनंतर तो फरार होता. अखेर आज त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

उदयपूरमधून केली अटक:

सोमवारी होर्डिंग कोसळल्याची घटना घडल्यानंतर भावेश भिंडे हा फरार होता. पोलीस गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना तो उदयपूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानं तेथील एका हॉटेलमध्ये आपल्या भाच्याच्या नावानं रुम बुक केली होती. त्यानंतर पोलिसांनी उदयपूर येथून भावेश भिंडेला अटक केली आहे. भावेश भिंडेला आता पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबईत आणलं जाणार आहे.

त्यादिवशी काय घडलं होतं..

सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घाटकोपर छेडानगर येथे १२० बाय १२० फुटांचे भव्य होर्डिंग BPCL पेट्रोल पंपावर पडले. यात सुमारे १६ जणांचा मृत्यू झाला होता. कोसळलेलं हे होर्डिंग रेल्वे हद्दीत बेकायदेशीररीत्या उभे होते. या ठिकाणी नियमानुसार ४० बाय ४० फुटांचे होर्डिंग उभारण्याची परवानगी संबंधित कंपनीला पालिकेने दिली होती. मात्र याकडे संबंधित इगो मीडिया कंपनीने दुर्लक्ष करीत २२ एप्रिलपासून होर्डिंगसाठी बेकायदा बांधकाम सुरू केले होते. याबाबत आलेल्या तक्रारींनंतर पालिकेने लोहमार्ग आयुक्तालयाकडे तक्रारही दाखल केली होती. शिवाय संबंधित कंपनीने होर्डिंग दिसण्यासाठी आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग केला होता. याबाबत तक्रारी आल्यानंतर पालिकेने मे महिन्यात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली हाती. या दुर्घटनेमुळे पालिकेने रेल्वेसह संबंधित आस्थापनांना नोटीस बजावली आणि एफआयआरही दाखल करण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in