घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास आता एसआयटीकडे; आरोपी भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्रे हस्तगत

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेचा तपास आता एसआयटीकडे सोपविण्यात आला असून पोलीस उपायुक्त विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू राहणार आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास आता एसआयटीकडे; आरोपी भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्रे हस्तगत

मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेचा तपास आता एसआयटीकडे सोपविण्यात आला असून पोलीस उपायुक्त विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू राहणार आहे. दरम्यान, तपास हाती येताच या पथकाने मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या कार्यालयातून काही कागदपत्रे हस्तगत केली असून त्याची शहानिशा सुरू आहे. तसेच होर्डिंगचा एक नमुना माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलाजिकल इन्स्टिट्यूटला पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार असून त्यानंतर काही गोष्टींचा उलगडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. सोमवार १३ मे रोजी इगो मीडिया कंपनीचे एक होर्डिंग जवळच असलेल्या एका पेट्रोलपंपावर कोसळून त्यात सात जणांचा मृत्यू झाला, तर ऐंशीहून अधिक लोक जखमी झाले होते.

या दुर्घटनेनंतर पंतनगर पोलिसांनी इगो कंपनीचे भावेश भिंडे व इतर आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधासह भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच भावेश हा पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू असताना त्याला राजस्थानच्या उदयपूरमधील एका हॉटेलमधून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांचा तपास नंतर पंतनगर पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या युनिट सातकडे सोपविण्यात आला. गुन्ह्यांची सर्व कागदपत्रे हाती येताच गुन्हे शाखेने भावेशला अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या रविवारी २६ मेपर्यंत पोलीस कोठडीत आहे.

भिंडेच्या कार्यालयातील ३ कर्मचाऱ्यांची जबानी घेतली

होर्डिंग दुर्घटनेच्या तपासासाठी आता विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. याच प्रकरणात आतापर्यंत काही जणांची जबानी नोंदविण्यात आली आहे. त्यात भिंडेच्या मुलुंड येथील कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या जबानीतून भिंडेने होर्डिंगचे आऊटसोर्सिंग केल्याचे बोलले जाते. त्यातून त्याला काही उत्पन्न मिळत होते. त्याची व्यावसायिक बाजू तपासण्याचे काम सध्या सुरू आहे. पोलिसांचे एक विशेष पथक होर्डिंग बांधकामाचे काही नमुने घेऊन माटुंगा येथील व्हीजेटीआय येथे घेऊन गेले होते. ते नमुने तपासणीसाठी देण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना दिला जाणार आहे. या अहवालानंतर पोलिसांची पुढील तपासाची दिशा ठरविली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in