घाटकोपरला ‘वायफाय’ स्मशानभूमी ; दूरच्या नातेवाईकांची अंत्यदर्शनाची सोय होणार

परदेशात किंवा देशात दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या अंत्यदर्शनाला हजर राहता येत नाही
File photo
File photo

आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्राचे किंवा अन्य कोणा संबंधीताचे निधन झाल्यावर प्रत्येकजण शोकाकूल होतो. काम किंवा वेळेअभावी प्रत्येकाला अंत्यसंस्काराला जाता येईलच, असे नाही. मात्र, ‘वायफाय’च्या जमान्यात ही सोय होऊ शकते. घाटकोपरच्या स्मशानभूमीत भारतात पहिल्यांदाच ही सोय करण्यात येत आहे. नातेवाईक किंवा मित्रांना अंत्यदर्शनाची ‘लाईव्ह’ सोय घाटकोपरच्या स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.

घाटकोपर (पू) येथील हिंदू स्मशानभूमी सोमय्या कॉलेजजवळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिचे काम रखडले आहे. या स्मशानभूमीची व्यवस्था ही ‘द हिंदू सभे’कडे आहे. या प्रकल्पासाठी १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘द हिंदू सभे’चे विश्वस्त व नामवंत आर्किटेक्ट मनोज डायसारिया यांनी सांगितले की, परदेशात किंवा देशात दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या अंत्यदर्शनाला हजर राहता येत नाही. त्यामुळे या सर्वांना रिअल टाईम अंत्यदर्शन होण्यासाठी ‘वाय फाय’ सुविधा देण्याचे ठरवले आहे.

ही स्मशानभूमी ४२०० चौरस मीटरमध्ये वसवली असून आणखी १५०० मीटर जागा ही सोमय्या ट्रस्टकडून मिळणार आहे. या स्मशानभूमीत गॅसवर आधारित दाहिन्या व ५ लाकडावरील दाहिन्या असतील. या स्मशानभूमीत मंदिर, संगीत, लायब्ररीची सोय असेल. ज्यांना अंतिम समयी संगीत किंवा मंत्र हवे असतील त्यांच्यासाठी म्युझिक सिस्टीम असेल, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाला १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे घाटकोपरच्या सर्व नागरिकांनी स्वागत केले आहे, असे स्थानिक व्यावसायिक परेश ठक्कर यांनी सांगितले.

दरम्यान, राहुल मेहरोत्रा ​​यांनी डिझाईन केलेल्या वरळी येथे ७५ हजार चौरस फुटांच्या पुनर्रचना केलेल्या स्मशानभूमीचे उद्घाटन जुलैअखेर होणार आहे. हा प्रकल्प हिरालाल पारेख परिवार ट्रस्टतर्फे राबविला जात आहे. सध्याच्या मनपाच्या स्मशानभूमीला हा आधुनिक पर्याय आहे. अनेकदा स्मशानभूमी या अस्वच्छ असतात आणि मूलभूत सुविधांचा अभाव असतो.

एसी प्रतिक्षालय

ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रमणीक पारेख म्हणाले की, नवीन स्मशानभूमीत आठ विशेष भाग असतील. त्यात मृताच्या कुटुंबीयांना पूर्णपणे खासगी व सन्मानजनकपणे आपल्या मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करता येतील. यातील प्रत्येक भागात ‘एसी’ असेल. प्रार्थनेसाठी चार प्रार्थना हॉल तसेच मोठे प्रतिक्षालय असतील. या स्मशानभूमीत साठवणुकीची सुविधा आणि सहाय्य सेवांसाठी पुरेशी जागा असेल.

logo
marathi.freepressjournal.in