गिरगावचा राजा गणेश मंडळाची अनोखी सजावट; बांबूपासून साकारले पृथ्वी, अग्नी, जल, वायूचे देखावे

पर्यावरण संवर्धनासाठी बांबूच्या झाडांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाने बांबूपासून पर्यावरणपूरक सजावट केली आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश असा देखावा बांबूपासून तयार करून गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाने अनोख्या पद्धतीने जनजागृती केली आहे.
गिरगावचा राजा गणेश मंडळाची अनोखी सजावट; बांबूपासून साकारले पृथ्वी, अग्नी, जल, वायूचे देखावे
Published on

मुंबई : सिमेंट काँक्रीटचे जंगल, झाडांची कत्तल यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आतापासून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी बांबूच्या झाडांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाने बांबूपासून पर्यावरणपूरक सजावट केली आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश असा देखावा बांबूपासून तयार करून गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाने अनोख्या पद्धतीने जनजागृती केली आहे.

अनन्यसाधारण महत्त्व असणारा बांबू “गिरगावचा राजा” या मंडळाने गणपतीच्या सजावटीसाठी वापरला आहे. यंदाचे वर्ष या मंडळाचे ९८ वे वर्ष आहे. म्हणूनच या सजावटीत ९८ प्रकारच्या विविध वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. सजावटीत मुख्यत्वे करून पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश साकारले आहे. बांबूपासून बनलेल्या टोपल्या, चटया, बांबूची विविध शिल्पे, बासरी, मशाल, बोट या सजावटीत वापरल्या आहेत. यात शालेय उपयोगी वस्तू, म्हणजे कंपास बॉक्स, पेन्सिल्स, पेनचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बहीणभावाच्या नात्यातील ऐक्य कायम ठेवणारी राखी ही या सजावटीत आकर्षण ठरत आहे, असे दिग्दर्शक सुमित पाटील यांनी सांगितले.

गिरगावचा राजा गणेश मंडळाची अनोखी सजावट; बांबूपासून साकारले पृथ्वी, अग्नी, जल, वायूचे देखावे
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे फोटो शेअर करा आणि जिंका मोठी बक्षिसे

बांबू शाश्वतत आणि पर्यावरणपूरक आहे. तो मातीची धूप थांबवतो, पर्यावरणाचे संतुलन राखतो. बांबूपासून बनलेल्या वस्तूंना आता पर्यावरणपूरक पर्याय म्हणून महत्त्व दिले जाते.

पर्यावरणाच्या जवळ जाण्याचा मार्ग या बांबूमुळे साध्य होत आहे. पर्यावरणपूरक पर्याय आपल्याला बांबूने दिलेत, तर “बांबू वापरूया आणि पर्यावरणाचा समतोल राखूया.” याबद्दलचे समाजप्रबोधन या मंडळाने केले आहे.

तीन रुग्णांना डायलेसिसची सुविधा

गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी गरीब व गरजू ५०० विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येते. रक्तदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदाच्या वर्षापासून डायलेसिसची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून तीन रुग्णांना डायलेसिसची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाचे सरचिटणीस गणेश लिंगायत यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in