डान्स Video वरून राडा: तरुणाच्या 'कोठा' कमेंटमुळे मुलगी संतापली, मुंबई पोलिसांनी घेतली दखल

'आधी शाळा-कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन व्हायचं पण आता तर 'कोठा' झालाय.
डान्स Video वरून राडा:  तरुणाच्या 'कोठा' कमेंटमुळे मुलगी संतापली, मुंबई पोलिसांनी घेतली दखल
Published on

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील प्रतिक आर्यन या वापरकर्त्यावर श्रुती पारिजा ही तरुणी चांगलीच भडकली आहे. प्रतिकने श्रुतीच्या परवानगीशिवाय तिचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल तर केलाच, पण त्यासोबत लांबलचक कॅप्शन लिहिताना तिच्या डान्सचा उल्लेख 'कोठा' (हिंदीतील शब्द ज्याचा मराठीत अर्थ कुंटणखाना होतो) असा केला. श्रुतीने अनेकदा विनंती करुनही त्याने व्हिडिओ डिलीट केला नाहीच उलट तिच्याशीच हुज्जत घातली. अखेर श्रुतीने त्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आणि आता पोलिसांनीही तक्रारीची दखल घेतली आहे.

एका महाविद्यालयीन कार्यक्रमातील श्रुतीच्या डान्सचा व्हिडिओ प्रतिकने पोस्ट करत, 'आधी शाळा-कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन व्हायचं पण आता तर 'कोठा' झालाय. सांस्कृतिक नृत्यांच्या नावाखाली सर्रासपणे आयटम साँगवर थिरकले जाते. शैक्षणिक व्यवस्थेसोबत भारताची संस्कृतीही धोक्यात आहे', असे कॅप्शन त्याने दिले होते.

सोशल मीडिया एक्स

दोन दिवसांनंतर प्रतिकची पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा, "व्हिडिओत दिसणारी मुलगी मी आहे आणि मी तुला माझा व्हिडिओ रिपोस्ट करण्याची परवानगी दिलेली नाही. कृपया तो हटवावा" असे श्रुतीने प्रतिकच्या पोस्टवर लिहिले. त्यानंतर अनेक नेटकरी श्रुतीच्या समर्थनार्थ उतरले आणि परवानगीशिवाय व्हिडिओ टाकल्याबद्दल प्रतिकवर टीका झाली. त्यानंतर, मी पुन्हा स्पष्ट करते की, माझा त्या कॉलेजशी काहीच संबंध नाही. मी एक प्रोफेशनल कोरिओग्राफर आहे आणि माझा व्हिडिओ काढून टाका ही एकच नम्र विनंती माझी प्रतिक आर्यन यांना आहे, असे श्रुतीने लिहिले.

मी त्या डान्स शोसाठी परिक्षक म्हणून बोलावले होते. प्रेक्षकांनी आग्रह केला म्हणून डान्स केल्याचेही तिने सांगितले. त्यानंतरही श्रुतीने अनेकदा प्रतिकला व्हिडिओ काढून टाक अशी कळकळीची विनंती केली, पण काहीही उपयोग झाला नाही.

सोशल मीडिया एक्स

अखेर तिने मुंबई पोलिसांना टॅग करत त्याची तक्रार केली. अनेकदा व्हिडिओ हटवण्याची विनंती करूनही प्रतीक व्हिडिओ हटवत नसून मी ज्या स्टेजवर डान्स केला त्याची तुलना कोठा म्हणून करत आहे. माझी बदनामी करतोय, प्रतिष्ठेला हानी पोहोचवतोय. व्हिडिओ हटवायला नकार देत उलट मलाच ब्लॅकमेल करतोय असे तिने लिहिले. त्यानंतर मुंबई पोलिसांनीही रिप्लाय देत तिची दखल घेतली आणि तिचा मोबाईल क्रमांक मागितला. त्यानंतर, मुंबई पोलिसांनी माझ्याशी संपर्क साधला असून कारवाई सुरू झाली असल्याची माहिती श्रुतीने दिली आहे. तसेच, कॉपी राइट्समुळे सध्या व्हिडिओ हटवला गेला आहे, पण प्रतीकने तो हटवला नाही. या प्रकरणाबाबत कायदेशीर बाबींबाबत लवकरच अपडेट देईल, असेही तिने सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in